नवी दिल्ली - भारतातील सर्वात श्रीमंत कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) दूरसंचार क्षेत्रात वादळ आणल्यानंतर आता ऑनलाईन रिटेल क्षेत्रातही भूकंप घडवण्याच्या तयारीत आहे. मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स जिओने स्वस्त डाटा आणि कॉलिंग प्लॅन्सची रणनीती वापरली होती. याच धर्तीवर आता पुन्हा ई-कॉमर्स क्षेत्रातही कंपनी अशीच रणनीती वापरण्याच्या तयारीत आहे.
मुकेश अंबानी दिवाळी सेलच्या माध्यमाने प्रतिस्पर्धक कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे दीर्घकाळापासून भारताच्या ई-कॉमर्स बाजारात जम बसवलेल्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. कारण जिओ मार्टने मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कनफेक्शनरी उत्पादनांवर 50 टक्के सूट देत आहे. याशिवाय रिलायन्स डिजिटलच्या वेबसाइटवर फोनदेखील अत्यंत कमी किमतीत मिळत आहेत.
प्रतिस्पर्धक वेबसाइट्सच्या तुलनेत रिलायन्स डिजिटलवर सॅमसंगचे स्मार्टफोन 40 टक्के कमी किमतीत मिळत आहेत. नुकताच आरआयएलला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. यामुळे, रिटेल सेक्टरमध्ये कमी किमतीत व्यापार करणे कंपनीसाठी आव्हानात्मक नसेल.
रिलायन्स जिओमध्ये साधारणपणे 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविल्यानंतर रिलायन्स रिटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला सुरुवात झाली. सध्या केकेआर आणि सिल्व्हर लेक सारख्या दिग्गज कंपन्यांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक केली आहे.
मॉर्गन स्टॅनलीच्या अंदाजानुसार, भारतात 2026पर्यंत ई-कॉमर्स सेल 200 अब्ज डॉलरच्याही पुढे जाऊ शकतो. मात्र, दूरसंचार क्षेत्राच्या तुलनेत रिलायन्सला येथे काही प्रमाणावर अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. कारण त्यांचा सामना दिग्गज अमेरिकन कंपनी अमेझॉन आणि वॉलमार्ट यांच्यासोबत आहे.