ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 28 - उत्तर प्रदेशनंतर आता झारखंडमध्येही अवैध कत्तलखाने बंद होणार आहेत. अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश झारखंडचे मुख्यमंत्री सीपी सिन्हा यांनी दिले आहेत. 72 तासांमध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी रविवारी अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केली जावी, यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर सोमवारी झारखंड सरकारकडून राज्यातील सर्व उपायुक्त, वरिष्ठ पोलीस अधिक्षक आणि पोलीस अधिक्षकांना त्यांच्या अखत्यारित येणारे अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
राज्यातील कत्तलखान्यांवर बंदी घातली जावी आणि गो-तस्करीला आळा बसावा, यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची मागणी या संघटनांकडून करण्यात आली होती. अवैध कत्तलखान्यांवर कारवाई न केल्यास 10 एप्रिलपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या संघटनांकडून सरकारला देण्यात आला होता. त्यामुळे सरकारने अवैध कत्तलखान्यांविरोधात कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे हॉटेल व्यवसाय मोडकळीस आला आहे. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद झाले आहेत.