ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - विमान प्रवास करतानाही आधार कार्डची सक्ती होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय तिकीट बूक करणं शक्य होणार नाही. केंद्र सरकारने आयटी क्षेत्रातील अग्रणी असलेल्या विप्रो कंपनीकडे यासंबंधी ब्ल्यू-प्रिंट विकसित करण्याची जबाबदारी सोपवली असल्याची माहिती मिळत आहे. विप्रो मे महिन्यापर्यंत आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रवाशांच्या अंगठ्याचा ठसा वापरुन त्यांच्या उड्डाणाशी संबंधित सर्व माहिती साठवण्यात येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार प्रवाशांची बायोमेट्रिक माहिती विमानतळांवर वापरण्यात येईल. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी पासपोर्ट गरजेचा असतो त्याप्रमाणे आंतरदेशीय उड्डाणांसाठी अंगठ्याचा ठसा गरजेचा असेल.
नागरी उड्डाण मंत्रालय हवाई प्रवासाच्या बुकिंगसाठी आधार नंबर लिंक करण्याच्या विचारात आहे. तसंच सर्व विमानतळांवर बायोमेट्रिक प्रवेश सुरु करण्याचादेखील विचार करत आहे. विमानतळ संचालक आणि एअरलाईन्सची नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा आणि सचिव आर चौबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर हिरवा कंदील दाखवत पाऊल टाकण्यास सुरुवात झाली आहे.
"तिकीट बूक करत असतानाचा प्रवाशांना आपला आधार कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. प्रवास करण्यासाठी एकदा ते विमानतळावर पोहोचले की त्यांना फक्त एन्ट्री पॉईंटला टच पॅडवर अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे. टर्मिनलमध्ये प्रवेश केल्यावर चेक-इन करतानाही त्यांना हीच प्रक्रिया करायची आहे. प्रवास करत असताना प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा आणि चांगला अनुभव मिळावा या हेतूने हा प्रयत्न असल्याचं", भारत विमानतळ प्राधिकरणचे प्रमुख मोहपात्रा यांनी सांगितलं आहे.
सध्या विमानतळांवर सुरक्षेच्या कारणास्ताव प्रवाशांना आपल्या तिकीटासोबत ओळखपत्र दाखवणं अनिवार्य आहे. त्याशिवाय टर्मिनलच्या आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही.