नवी दिल्ली : पुढील तीन महिन्यांत रिकाम्या होत असलेल्या राज्यसभेच्या ५७ जागांसाठी येत्या ११ जून रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली. हे सदस्य महाराष्ट्रासह १५ राज्यांच्या विधानसभांकडून निवडून दिले जातील. महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या सहा सदस्यांची मुदत येत्या १ ते ४ जुलै दरम्यान संपत असून त्यांच्या जागी नवे सदस्य निवडले जातील.आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या ५७ जागा भरण्यासाठी संबंधित राज्य विधानसभांमध्ये ११ जून रोजी स. ९ ते सा. ४ या वेळात मतदान घेण्यात येईल व त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.भारतीय संघराज्यातील घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यांच्या विधानसभांकडून तेथे सदस्य निवडून पाठविले जातात. राज्यसभा हे स्थायी सभागृह असून त्यातील एक तृतियांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात. त्याप्रमाणे सहा वर्षांपूर्वी १५ राज्यांच्या विधानसभांनी निवडून पाठविलेले ५७ सदस्य येत्या २१ जून ते १ आॅगस्ट या दरम्यान निवृत्त होत आहेत. रिक्त होणाऱ्या या जागा भरण्यासाठी ही निवडणूक घेण्यात येईल. यापैकी अपक्ष म्हणून निवडून आलेले वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांनी गेल्याच आठवड्यात राजीनामा दिला होता.निवडणूक घेण्यात येणाऱ्या ५७ जागांची राज्यनिहाय फोड अशी: उत्तर प्रदेश- ११, महाराष्ट्र व तमिळनाडू प्रत्येकी सहा, बिहार-पाच, आंध्र प्रदेश, कर्नाटक व राजस्थान प्रत्येकी चार, मध्य प्रदेश व ओडिशा प्रत्येकी तीन, तेलंगण, छत्तीसगढ, पंजाब, झारखंड व हरियाणा प्रत्येकी दोन व उत्तराखंड एक. निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी १४ सदस्य भाजपा व काँग्रेसचे आहेत. इतर सदस्यांची पक्षनिहाय गणना अशी: बसपा-६, जदयू-५, सपा व बिजू जनता दल प्रत्येकी ३, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक व अण्णाद्रमुक प्रत्येकी २ आणि अकाली दल, शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक. (लोकमत न्यूज नेटवर्क)निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू (कर्नाटक), रेल्वेमंत्री सुरेश प्रभाकर प्रभू व ग्रामीण विकासमंत्री राव बिरेंद्र सिंग (हरियाणा), वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन (आंध्र प्रदेश) व ऊजार्मंत्री पियुष गोयल (महाराष्ट्र) यांच्याखेजीज मुख्तार अब्बार नक्वी (उत्तर प्रदेश) व ज्येष्ठ वकील राम जेठमलानी (राजस्थान) या भाजपाच्या सदस्यांचा समावेश आहेत. काँग्रेसचे निवृत्त होणारे सदस्य : जयराम रमेश (आंध्र प्रदेश), मोहसिना किदवई (छत्तीसगढ), व्ही. हनुमंत राव (तेलंगण), आॅस्कर फर्नांडिस (कर्नाटक), अंबिका सोनी (पंजाब) व आनंद शर्मा (राजस्थान). जदयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव (बिहार) हेही जुलैमध्ये निवृत्त होतील.राज्यातून निवृत्त होणारे सदस्य महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या ज्या सहा सदस्यांची मुदत संपत आहे ते असे: केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष वेदप्रकाश गोयल (भाजपा), ईश्वरलाल शंकरलाल जैन व प्रफुल मनोहरभाई पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), विजय जवाहरलाल दर्डा व अविनाश नारायणप्रसाद पांडे (काँग्रेस) व संजय राजाराम राऊत (शिवसेना).
आता राज्यसभेची लढाई
By admin | Published: May 13, 2016 4:15 AM