मंगळुरू: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील वातावरण तापले असतानाच आता येथील एका स्वयंसेवी संस्थेने येथील भिकारी व बेघरांची नावेही निवडणूक यादीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला आहे. डेमोक्रॅटिक अम्बेसेडर फॉर इंडिया रुरल इंटिग्रिटी ( दारी) या संस्थेने निवडणूक आयोगाकडे रीतसर तशी मागणी केली आहे. तोपर्यंत विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया स्थगिती करावी, असे 'दारी'ने म्हटले आहे. 'दारी'च्या या मागणीनंतर मंगळुरूचे उपायुक्त शशिकांत सेनथिल यांनी भिकारी व बेघरांची वैयक्तिक माहिती जमा करायला सुरूवात केली आहे. यासाठी सध्या पुनर्वसन केंद्रासह विविध ठिकाणी जाऊन माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही या सर्वांची नावे निवडणूक यादीत समाविष्ट करू असे सेंथिल यांनी म्हटले आहे. एका ढोबळ निष्कर्षानुसार कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येत भिकाऱ्यांचे प्रमाण पाच टक्के इतके आहे. मात्र, त्यांना मतदानाचा हक्क नाही. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून या सर्वांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहे. मात्र, ही प्रक्रिया येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे. येत्या 12 तारखेला कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे व 15 तारखेला निकाल जाहीर होईल.
Karnataka polls 2018: भिकारी व बेघरांचाही मतदार यादीत समावेश?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 11:17 AM