नवी दिल्ली : प्रारंभी रा.स्व. संघाच्या मदतीची आम्हाला निश्चितच आवश्यकता भासत होती; पण आता भाजप सक्षम झाला असून, स्वबळावर सारे निर्णय घेत आहे, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केले.
एका मुलाखतीत भाजप रा.स्व. संघाची मदत घेतो का, यासंदर्भातील प्रश्नावर नड्डा म्हणाले की, भाजप आता मजबूत पक्ष झाला आहे. प्रत्येक कार्यकर्ता, नेत्यावर विशिष्ट जबाबदारी सोपविली आहे. संघ ही सांस्कृतिक व सामाजिक संघटना आहे, तर भाजप राजकीय पक्ष आहे. संघ हा वैचारिक आघाडीचे काम करतो, तर भाजप आपले राजकीय कार्य करतो. भाजप स्वबळावर सारे निर्णय घेतो. एखाद्या राजकीय पक्षाने याच पद्धतीने काम करणे अपेक्षित असते.
मथुरा, काशी येथील वादग्रस्त ठिकाणी भविष्यात मंदिरे उभारण्याची भाजपची योजना नसल्याचे नड्डा यांनी सांगितले. भाजपला मनात अशी काही संकल्पना किंवा इच्छाही नाही. पक्षात कधी त्याची चर्चाही झाली नाही. पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये ज्या विषयांवर चर्चा होते, त्यानुसारच धोरणे ठरविली जातात, असे नड्डा म्हणाले. गरीब, शोषित, महिला, युवक, शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचेही नड्डा यांनी यावेळी नमूद केले.
भाजप संघावर बंदी घालू शकतो : ठाकरेरा. स्व. संघाचे १०० वे वर्ष धोक्याचे असून भाजप संघालाही नकली संघ म्हणू शकतो. भाजप संघावर बंदीही घालू शकतो, अशी टीका उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
‘राम मंदिर उभारणीचा विषय भाजपच्या अजेंड्यावर होता’अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर राम मंदिर उभारले जावे, अशी मागणी भाजपने पालमपूरच्या अधिवेशनात जून १९८९ मध्ये केली होती. प्रदीर्घ संघर्षानंतर आता रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. एक स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. हे राम मंदिर आमच्या अजेंड्यावर होते. भाजप हा एक मोठा पक्ष आहे. त्यातील प्रत्येक नेत्याची बोलण्याची वेगळी शैली आहे, असे म्हणत पक्षाध्यक्ष नड्डा यांनी पक्षांतील नेत्यांच्या विधानावर भाष्य केले.