नवी दिल्ली - हल्लीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कन्हैया कुमारने भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपा आणि उजवी मंडळी ज्या तुकडे-तुकडे घोषणेवरून कन्हैयावर टीका करत असे, त्याच तुकडे तुकडे घोषणेचा आधार घेत कन्हैयाने भाजपाला टोला लगावला आहे. आता आम्ही भगवा पार्टीचे तुकडे तुकडे करणार असा इशारा कन्हैया कुमारने दिला आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कन्हैया कुमारने सांगितले की, भाजपा मला तुकडे तुकडे गँग म्हणून हिणवते. मी भाजपासाठी तुकडे तुकडे आहे. आता मी भाजपाचे तुकडे तुकडे करेन. भाजपा गोडसेंना राष्ट्रपिता मानते. गांधीजींना नाही. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यासमोर गांधीजींचं कौतुक करते.
यावेळी कन्हैया कुमारने मोदी आणि अमित शाहांवरही जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा म्हणजे नथुरामने बनवलेली जोडी आहे, असा निशाणा त्याने साधला. कन्हैया पुढे म्हणाला की, अनेक इतर तरुणांप्रमाणेच मलाही खूप उशीर झाल्याचे वाटते. ज्या पक्षाकडे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा वारसा आहे. त्या स्वातंत्र्याला वाचवण्यासाठी तो पक्षा सर्वात प्रबळ असला पाहिजे. जे लोक केवळ आपल्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहेत. ते आज भाजपामध्ये दाखल झाले आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेल्या कन्हैयाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय येथून निवडणूक लढवली होती. मात्र भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी त्याचा दारुण पराभव केला होता. गेल्या काही काळापासून त्याचे सीपीआयमधील संबंध बिघडले होते. अखेरीस त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.