‘आता २०२८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणा, पण…’ PM नरेंद्र मोदींचा विरोधकांना खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 09:08 PM2023-08-10T21:08:26+5:302023-08-10T21:08:51+5:30
No Confidence Motion: विश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षांकडून आणलेला अविश्वास प्रस्ताव हा आपल्यासाठी शुभ असल्याचा दावा केला. तसेच आता २०२८ मध्येही अविश्वास प्रस्ताव घेऊन या. मात्र त्यावेळी थोडी तयारी करून या, आसा खोचक सल्लाही दिला.
विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव अखेर आवाजी मतदानाने फेटाळला गेला. या प्रस्तावावर जेव्हा मतदान झाले त्याआधीच विरोधक सभात्याग करून सभागृहाबाहेर गेलेले होते. त्यामुळे हा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला गेला. तसेच त्यावर प्रत्यक्ष मतदान घेण्याची वेळ आली नाही. तत्पूर्वी अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांकडून आणलेला अविश्वास प्रस्ताव हा आपल्यासाठी शुभ असल्याचा दावा केला. तसेच आता २०२८ मध्येही अविश्वास प्रस्ताव घेऊन या. मात्र त्यावेळी थोडी तयारी करून या, आसा खोचक सल्लाही दिला.
अविश्वास प्रस्तावावरून विरोधी पक्षांना सुनावताना नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधक कुठलेही मुद्दे शोधू शकत नाही आहेत. त्यांच्याकडे कुठलंही नाविन्य नाही आहे. तसेच त्यात कुठलीही कल्पकताही नाही आहे. आता २०२८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणा. मात्र पुढच्या वेळी थोडी तयारी करून या, असे मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, आता थोडं डोक्याला चालना देणारं काम करा. राजकारण आपल्या जागी आहे. संसद हे पक्षांसाठी उभा केलेला प्लॅटफॉर्म नाही आहे. ती देशासाठी सन्मानित सर्वोच्च स्थान आहे. अशा परिस्थितीत खासदारांनी त्याचं गांभीर्य समजलं पाहिजे. येथील प्रत्येक क्षणाचा उपयोग हा देशासाठी केला गेला पाहिजे. मात्र विरोधी पक्षांना हे दिसत नाही आहे, असा टोला मोदींनी लगावला.
दरम्यान, या उत्तराला सुरुवात करताना नरेंद्र मोदींनी विरोधकांकडून आणला गेलेला अविश्वास प्रस्ताव आपल्यासाठी शुभ ठरतो, असे सांगितले. ते म्हणाले की, ईश्वर खूप दयाळू असतात. कुणाला तरी ते माध्यम बनवतात. मी याला ईश्वराचा आशीर्वाद मानतो की त्यांनी विरोधकांना सुचवलं आणि ते प्रस्ताव घेऊन आले. २०१८ मध्येही हा ईश्वराचाच आदेश होता. त्यामुळे विरोधक अविश्वास प्रस्ताव घेऊन आले होते. अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, उलट ही त्यांचीच फ्लोअर टेस्ट. हे मी तेव्हा म्हणालो होतो आणि शेवटी तसचं झालं. विरोधकांकडे जेवढी मतं होती, तेवढी मतंही त्यांना मिळवता आली नव्हती, असा निशाणा नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर साधला.