नवी दिल्ली - डोकलाम मुद्यावरुन भारताबरोबर निर्माण झालेल्या संघर्षावर सुरक्षित तोडगा निघाल्याबद्दल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समाधान व्यक्त केले आहे. डोकलामच्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीनच्या सरंक्षण आणि अन्य मंत्रालयांनी एकत्रित काम केले असे लियु फांग म्हणाल्या. त्या चिनी लष्करात वरिष्ठ अधिकारी आहेत. डोकलाममध्ये जवळपास दहा आठवडे चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते.
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. चीनची धोरणे ठरवण्यासाठी आणि भविष्यातील नेते निवडण्यासाठी दर पाचवर्षांनी ही परिषद होते. खरतर डोकलामचा भूभाग भूतानच्या हद्दीत येतो. पण चीनने या भागावर हक्क सांगून रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने संघर्षाची स्थिती उदभवली. चीनच्या डोकलाममध्ये रस्ता बांधणीमुळे भारताचा महत्वाचा प्रदेश चीनच्या टप्प्यामध्ये येणार होता. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे परवडणारे नसल्याने भारताने तीव्र आक्षेप घेत रस्ता बांधणीचे काम रोखले.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अन्य देशांच्या लष्करांबरोबर संवादाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचा फायदा होताना दिसतोय असे लियु म्हणाल्या. चीन आपल्या मित्रपरिवाराचा विस्तार करत असून, फक्त मोठे देशच नव्हते छोटया देशांबरोबरही मैत्रीसंबंध प्रस्थापित करतोय असे लियु म्हणाल्या.
डोकलाममध्ये 73 दिवस भारत आणि चीनचे सैन्य समोरा-समोर होते. चीनकडून यावेळी बघून घेण्याची भाषा केली जात होती. ग्लोबल टाइम्स आणि अन्य चीन सरकारच्या मालकीच्या वृत्तपत्रांमधून धमक्या दिल्या जात होत्या. पण भारतीय लष्कराने जाहीरपणे कुठलीही अरेरावीची भाषा न करता संयमाने हा विषय हाताळला. चीन मधल्या एका वृत्तपत्राने तर युद्धाची डेडलाईन घोषित केली होती. पण भारताने आपल्या डिप्लोमसीने चीनवर दबाव वाढवला. अखेर युद्धाची भाषा करणा-या चीनला मागे हटावेच लागले.
दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं.