ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि. 22 - दिवसेंदिवस विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाबरोबर स्वयंचलित यंत्रमानव अर्थात रोबोही विकसित होत आहेत. अनेक जटील कामे लिलया करण्यापर्यंत रोबोंनी मजल मारली आहे. आता तर चक्क माडावर चढून नारळ तोडण्याचे काम देखील रोबो करणार आहे. केरळमधील अमृत विश्वविद्यापीठ इंजिनियरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा रोबो तयार केला असून, तो माडावर चढून नारळ तोडून आणण्यात सक्षम आहे.
हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार या यंत्रमानवाची नारळाच्या बागेत यशस्वीरित्या चाचणी झाली असून, पुढील सहा महिन्यांत विश्वविद्यापीठाचे विद्यार्थी हा रोबो बाजारात आणणार आहेत. मात्र या रोबोच्या उपयोगितेमुळे बाजारात येण्यापूर्वीच त्याची मागणी फार वाढली आहे. हा रोबो रिमोटद्वारे नियंत्रित होत असून, त्याला माडावर बसवण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो. हा रोबो बननण्यासाठी जवळपास 1 लाख 80 हजार रुपये खर्च होतो. मात्र मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यावर त्याची किंमत एक लाखापर्यंत खाली येऊ शकते.
केरळमधील आध्यात्मिक गुरू असलेल्या माता अमृतादमयी यांच्या कल्पनेतून आणि अमृत विश्वविद्यापीठ इंजिनियरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनातून हा रोबो तयार झाला आहे. या रोबोमुळे नारळ उत्पादनात वाढ होऊ शकते, तसेच पेटंट मिळाल्यानंतर हा रोबो बाजारात आणला जाईल, असे महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेश कन्नन यांनी सांगितले.