बेंगळुरु- कर्नाटकात सर्वात जास्त सदस्य निवडून आणणाऱ्या पक्षाला म्हणजे भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलावल्यानंतर राज्यामध्ये त्याचे पडसाद अजून उमटत आहेत सर्वोच्च न्यायालयासह सर्व दरवाजे ठोठावल्यानंतर काँग्रेसने याचा पुढचा अंक गोव्यात घेण्याचे ठरवले आहे. गोव्यामध्ये काँग्रेसला इतर पक्षांपेक्षा सर्वात जास्त म्हणजे 16 जागा मिळाल्या होत्या.काँग्रेसने आता गोव्यात 16 आमदारांच्या पत्रांसह राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याचे निश्चित केले आहे. त्याबरोबरच मणिपूर आणि मेघालयामध्येही काँग्रेस असा दावा करेल. इतकेच नव्हे तर बिहारमध्ये राजदही आपण सर्वात जास्त सदस्यांचा पक्ष असल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आपल्याला राज्यपालांनी बोलवावे अशी विनंती करु शकतो. राजदचे नेते आणि लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी कालच ट्वीट करुन कर्नाटकाचा न्याय आम्हाला लावून राजद आणि काँग्रेसला बिहारमध्ये सत्ता स्थापन करु द्यायला हवी असे मत मांडले होते.गोव्यामध्ये बहुमतासाठी काँग्रेसला 4 जागा कमी पडत होत्या. भाजपाला 40 जागांच्या विधानसभेत 14 जागा मिळाल्या होत्या. भाजपाने गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या साहाय्याने सत्ता स्थापन केली होती. कर्नाटकात राज्यपाल वजूभाई वाला अँग्लो इंडियन समुदायाच्या सदस्याची नेमणूक विधानसभेत करु शकतात, त्य़ामुळे भाजपाला एक सदस्याचे आणखी पाठबळ मिळेल म्हणून जेडीएस आणि काँग्रेस अॅंग्लो इंडियन सदस्याची नेमणूक रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहेत.
कर'नाटका'चा नवा प्रयोग आता गोव्यात; सत्तास्थापनेसाठी काँग्रेस करणार दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 4:40 PM