नवी दिल्ली - सध्या आसाम 'ऑपरेशन लोटस'चं केंद्र बनलंय का? महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर आता झारखंडमध्येही ऑपरेशन लोटसची पटकथा लिहिली जात आहे. झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांना बंगाल पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. काँग्रेस अन्य एका आमदाराने आरोप लावला आहे की, पक्षाचे ३ आमदार गुवाहाटीला जात होते. ज्याठिकाणी झारखंडमध्ये भाजपा सरकार बनवण्याची रणनीती आखली जात आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीसरकारविरोधात बंड पुकारणारे शिवसेना आमदार गुजरातच्या सूरतमार्गे आसामच्या गुवाहाटीला पोहचले होते. आसाममध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम करत महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटस यशस्वी केले होते. झारखंडमध्येही त्याच धर्तीवर हेमंत सोरेन सरकारविरोधात सत्तांतर करत भाजपा सरकार बनवण्याची रणनीती आखली जात आहे. तत्पूर्वी काँग्रेस आमदार आसामला पोहचण्यापूर्वीच पोलिसांच्या हाती ते लागले आहेत.
झारखंडमधील काँग्रेस आमदार इरफान अन्सारी, राजेश कच्छप, नमन बिक्सल कोंगारी यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. बंगालच्या रानीहाटीमार्गे हायवेवर पोलिसांनी ही कारवाई केली. अशावेळी काँग्रेसचे आमदार कुमार जयमंगल सिंह यांनी आरोप लावला आहे की, पश्चिम बंगालमध्ये ज्या काँग्रेस आमदारांना पकडले गेले त्यांच्याकडून कॅश जप्त करण्यात आली आहे. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि कोलकाता येण्यास सांगितले.
जयमंगल सिंह म्हणाले की, ३ आमदारांनी सांगितले गुवाहाटीत गेल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना भेटण्यास जाणार असून झारखंडमध्ये भाजपा सरकार आणण्याचं प्लॅनिंग रचलं जाईल. जितके आमदार फुटतील त्या सर्वांना मंत्री बनवलं जाईल. त्याशिवाय प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये मिळतील. झारखंडमधील विद्यमान हेमंत सोरेन सरकार पाडण्यासाठी त्यांना भाजपाची मदत करावी लागेल असंही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यातील सत्ता उलटवण्यासाठी आसामचा वापर केला गेला. त्यामुळे भाजपाच्या ऑपरेशन लोटससाठी आसाम केंद्र बिंदू बनलय का? असा प्रश्न उपस्थित होतो. झारखंडमधील सत्तानाट्यात सीएम हिमंत बिस्वा सरमा यांची भूमिका आहे? भाजपानं जे महाराष्ट्रात केले तेच पुन्हा झारखंडबाबतीत करत आहे असा आरोप काँग्रेसनं लावला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, झारखंडमध्ये भाजपाचं ऑपरेशन लोटस पश्चिम बंगालमध्ये उघड झाले. सरकार अस्थिर करण्यासाठी खुद्द एका राज्याचे मुख्यमंत्री थेट आमदारांशी संपर्क साधत आहेत. केंद्रातील मंत्री त्यांना धमकावत आहेत. महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही सत्तापरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.