या वर्षाच्या अखेरीस राजस्थानात विधानसभा निवडणूक होत आहे. भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाने (भाजप) राजस्थानात पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे. तर काँग्रेसही पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी कामाला लागली आहे. दोन्ही पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
राजस्थानातील काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, गेहलोत सध्या फ्रंटफूटवर खेळत आहेत. काँग्रेस हायकमांडने राजस्थान निवडणुकीसाठी गेहलोत यांना फ्रीहॅन्ड दिला आहे. अर्थात राजस्थान विधानसभा निवडणुकीशी संबंधित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य गेहलोत यांना देण्यात आले आहे. अशा स्थितीत राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपचे गुजरात निवडणूक मॉडेलचा वापर करू शखते, असे बोलले जात आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली होती. यानंतर आलेला निकाल धक्कादायक होता. गेल्या वर्षीच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून इतिहास रचला होता.
काय होते भाजपचे गुजरात निवडणूक मॉडेल -गुजरातमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. या निवडणुकीत भाजपला 156 जागा मिळाल्या होत्या. यादरम्यान भाजपने गुजरातमधील आपल्या अनेक विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले होते. आता राजस्थानात अशोक गेहलोत सरकार हेच मॉडेल वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचे काही राजकीय जाणकारांचे मत आहे. यामुळे राजस्थानातही अनेक विद्यमान आमदारांची तिकीट कापली जाण्याची शक्यता आहे.
अनेक आमदारांची तिकिटं कापण्याचे संकेत -राजस्थानात डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी गेहलोत आपल्या अनेक आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेहलोत यांनी यापूर्वी एक सर्वेक्षण केले होते. यात काही आमदारांना चांगले नंबर्स मिळाले नाहीत. यानंतर, गेहलोतांनी राजस्थानची जनता काही आमदारांच्या कामावर समाधानी नसल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे या काही आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकते. यात 60 ते 70 आमदारांचा नंबर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.