सुरेश भटेवरा। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताकाचे १५वे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी येत्या ५ आॅगस्ट रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापतीही असतात. विद्यमान उपराष्ट्रपती डॉ. हामीद अन्सारी यांची मुदत १० आॅगस्ट रोजी संपत आहे. डॉ. अन्सारी सन २००७ व २०१२ अशा लागोपाठच्या दोन निवडणुकांमध्ये या पदावर निवडून आले होते.मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ४ जुलै रोजी अधिसूचना प्रसिद्धीने या निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू होईल. १८ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील व त्यांची छाननी १९ जुलै रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत २१ जुलैपर्यंत असेल.एकाहून अधिक उमेदवार रिंगणात असतील तर ५ आॅगस्ट रोजी स. १० ते सा. ५ या वेळात मतदान घेतले जाईल व लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मिळून ७९० सदस्य मतदार असतील. यात लोकसभेच्या दोन नामनिर्देशित सदस्यांसह एकूण ५४५ सदस्यांचा व राज्यसभेच्या १२ नामनिर्देशित सदस्यांसह एकूण २४५ सदस्यांचा समावेश असेल. त्यांची अधिकृत मतदारयादी निवडणूक आयोग यथावकाश प्रसिद्ध करेल.राज्यसभेचे महासचिव शमशेर शरीफ या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. त्यांच्या मदतीसाठी राज्यसभा सचिवालयातील काही अधिकाऱ्यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली जाईल.
आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचेही पडघम
By admin | Published: June 30, 2017 12:39 AM