नवी दिल्ली : स्वस्त धान्य दुकानांतून वीज, पाणी व अन्य सुविधांची बिले भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय या दुकानांतून पॅन क्रमांक व पासपोर्टचे अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली जाणार असून, निवडणूक आयोगाशी संबंधित सेवाही उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयाने यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडशी एक सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी अन्न व पुरवठा सचिव सुधांशू पांडेय आणि सीएससीचे दिनेशकुमार त्यागी यांची उपस्थिती होती.
दुकानदारांना मिळेल नवीन व्यवसाय संधीस्वस्त धान्य दुकानांतून केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये गरिबांना अत्यल्प दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या योजनेत ८० कोटी कुटुंबांना सामावून घेण्यात आले आहे. या सर्वांना नव्या सुविधांचा लाभ घेता येईल. यातून लोकांना सेवा मिळेलच, पण त्याबरोबरच दुकानदारांनाही नवीन व्यवसाय मिळेल.