हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : स्वत:चे घर व्यवस्थित करण्यासाठी काँग्रेस धडपड करीत असताना भाजपची संपूर्ण यंत्रणा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ज्या १४४ जागा गमावल्या होत्या तेथील १.१२ लाख मतदान केंद्रांपैकी पक्षाने ८४ हजार बूथवर सर्वेक्षण केले आहे. महाराष्ट्रातील सर्व बूथचा यात समावेश आहे. उर्वरित ३८ हजार बूथ लवकरच पूर्ण करण्यात येतील. कमकुवत बूथ ओळखण्याचे हे काम यावर्षी मे महिन्यात हाती घेण्यात आले होते.
पहिल्या टप्प्यात प्रत्येक मतदाराचा डाटाबेस आणि प्रोफाइल तयार करण्याचे उद्दिष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की, पक्षाने या बूथवर मतदारांचा विश्वास जिंकण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. हिमाचल आणि गुजरात या दोन राज्यांतील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच हे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच सप्टेंबरमध्ये हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये मोठ्या सभांना संबोधित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ नेते या दोन राज्यांना नियमितपणे भेट देत आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही गुजरातमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला.
या ठिकाणी असेल लक्ष
लोकसभेच्या या १४४ जागा जिंकण्यासाठी मोदींनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघांचे वाटप केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महाराष्ट्रातील बारामती येथे लक्ष ठेवून आहेत. बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, केरळ, पूर्वोत्तर राज्यांवर भाजपचे विशेष लक्ष असेल. बदललेल्या राजकीय परिस्थितीत लोकसभेच्या ४० पैकी ३९ जागा जिंकून एनडीएच्या कामाची पुनरावृत्ती करण्याचे कठीण काम बिहारमध्ये आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"