- हरिश गुप्ता; राष्ट्रीय संपादकराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सन १९४९ पासून ज्यासाठी अथक परिश्रम केले ते अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागी श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्याचे स्वप्न साकार होत असल्याने पंतप्रधान मोदी यांनी, आता काशी व मथुरेचा शिल्लक राहिलेला वादग्रस्त विषय लावून धरू नका, असा स्पष्ट संदेश संघाच्या नेत्यांना दिला आहे. त्याऐवजी भगवान रामाची लाट जगभर पोहोचवण्यावर भर द्यावा, असे मोदींना वाटते. काही संत व संघातील कट्टरपंथी मथुरा व काशी पुन्हा हिंदूंनी ताब्यात घेण्यावर आग्रही आहेत. पण आता अयोध्या हाती आल्याने तिचाच जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ म्हणून विकास करण्यावर मोदींचा भर आहे.अयोध्येच्या बाबतीत मुस्लीमही सोबत यावेत यासाठी मोदींनी नाना तऱ्हेने भरपूर प्रयत्न केले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर देशात कुठेही गडबड होणार नाही, याची शाश्वती केली. इतर वादग्रस्त विषय हाती घेऊन या कमावलेल्या सदिच्छा गमावण्याची मोदींची इच्छा नाही. माहीतगारांच्या सांगण्यानुसार मे २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून अयोध्येतील राम मंदिराच्या विषयात मोदींनी प्रत्येक टप्प्याला अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष घातले. अयोध्येतील मंदिर उभारणी हा मोदींच्या आयुष्यातील फार मोलाचा टप्पा आहे. जे शक्य वाटत नव्हते ते त्यांनी शक्य करून दाखवले आहे. त्यामुळे देशातील सांप्रदायिक सलोखा टिकून राहावा यासाठी नेहमीपेक्षा अधिक काही करावे लागले तरी ते करण्याची मोदींची तयारी आहे.
संघनेते मोदींवर संतुष्टडॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये ९५ वर्षांपासून स्थापन केलेल्या संघाने मनात ठेवलेला एक महत्त्वाचा अजेंडा पूर्ण केल्याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह रा. स्व. संघाचे सर्वच नेते पंतप्रधान मोदींवर जाम खूष आहेत. ज्याच्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले ते काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेचे कलम ३७० मोदींनी मोडीत काढले.शिवाय त्यांनी तिहेरी तलाकवरही बंदी आणली. अत्यंत वादग्रस्त अशा नागरिकत्व कायद्यातही दुरुस्ती केली. जागतिक योग दिवस सुरू केला. नवे शैक्षणिक धोरण बनवले. आयुर्वेदाला चालना दिली व अयोध्येत राम मंदिराच्या कामालाही सुरुवात केली. सहा वर्षात हे सर्व केल्यावर संघ मोदींवर संतुष्ट असणे स्वाभाविक आहे. अयोध्येला जाण्यापूर्वी संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत जमून यावर विचारमंथन केले आणि त्यांना जाणवले की आता समान नागरी कायद्याखेरीज आग्रह धरावा असे काहीही राहिलेले नाही.