ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - आता घरबसल्या आपल्याला पैसे मिळणार आहेत, वाटलं ना आश्चर्य. होय, आता ई-कॉमर्समधील ऑनलाइन सामानांची विक्री करणा-या स्नॅपडील या कंपनीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्ही पैशांसाठी ऑर्डर करू शकता. ऑर्डरवर स्नॅपडील कंपनी तुमच्या घरपोच पैसे घेऊन येईल.
स्नॅपडील ही कंपनी तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीतून जमा झालेले पैसे तुम्हाला देणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने यासंबंधी एक अटसुद्धा ठेवली आहे. ती म्हणजे तुम्ही एकाच वेळी फक्त दोन हजार रुपयांपर्यंत कॅश मागवू शकता. पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डद्वारेच कंपनीला पैसे परत करावे लागणार आहेत. यासाठी बुकिंग करताना फ्री चार्ज किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला या सुविधेसाठी एक रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. तसेच कॅश ऑर्डर करतेवेळी तुम्हाला कोणतेही सामान मागवताना कोणतीही अडचण येणार नाही.
दरम्यान, देश वेगाने डिजिटलाइजेशनकडे जात आहे. त्यामुळे आम्ही वेळेनुसार अनेक योजना सुरू केल्या आहेत, असे स्नॅपडीलचे सहसंस्थापक रोहित बन्सल यांनी सांगितले.