वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असून न्यायाची लढाई लढणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने मागितेलले सर्व पुरावे आम्ही दाखल केले होते, तरीही माझी उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे तेजबहादूर यांनी म्हटले आहे.
तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे सपा-बसपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, मात्र उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदींनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला. तसेच माझी उमेदवारी रद्द करणे चुकीचे असून मी निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला मंगळवारी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत संबंधित कागदपत्रे, पुरावे देण्याचे बजावले होते. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रे जमा केले होते. तरीही, आयोगाने माझी उमेदवारी रद्द केली असून हे चुकीचे आहे. याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाची लढाई लढणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे.
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली आहे. सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बडतर्फ बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते. या मतदारसंघात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी तेज बहाद्दूर यांचा अर्ज रद्द केला. आता शालिनी यादव सपाकडून मोदींविरोधात उभ्या राहणार आहेत. यावेळी तेज बहाद्दूर समर्थक आणि पोलिसांदरम्यान जोरदार वादवादी झाली. त्यानंतर पोलिसांनी समर्थकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून बाहेर काढले.