नवी दिल्ली : बिहारमधील टॉपर घोटाळ्यानंतर आता गुजरातमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. दहावीच्या महत्त्वाच्या परीक्षेत शाळेकडून गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट होत आहे. ५०० विद्यार्थ्यांचे गणिताचे पेपर तपासल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. गुजरात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंंडळाने केलेल्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणिताच्या पेपरमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी त्रिकोणाला चार भुजा असतात असे लिहिले आहे, तर काही विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आपल्याला याचे उत्तर माहीत नसल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गणित सब्जेक्टिव्हमध्ये शून्य गुण आहेत त्यांना आॅब्जेक्टिव्हमध्ये ९० पैकी ९० गुण देण्यात आलेले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमधून ही बाब समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, सीसीटीव्हीच्या मागून शिक्षकाकडून आम्हाला उत्तरे सांगितली जात होती. (वृत्तसंस्था)>खटाटोप अनुदानासाठीगुजरातमध्ये शाळेच्या एकूण गुणवत्तेवर किंवा निकालावर त्या शाळेचे अनुदान अवलंबून आहे. या अनुदानासाठीच शाळेकडून हा खटाटोप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कारण विद्यार्थ्यांच्या निकालावरच शाळेच आर्थिक भवितव्य अवलंबून आहे.
आता गुजरातमध्येही दहावीचा टॉपर घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2016 4:04 AM