ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्ताननं अखेर दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने लाहोर हायकोर्टात यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. हाफिज सईदचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचं या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे.
"हाफिज सईदला काही महिन्यांपासून अवैधरित्या कैदेत ठेवण्यात येत आहे", अशी याचिका जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेनं कोर्टात दाखल केली होती. यावर पाकिस्तान सरकारने कोर्टात सांगितले की, "हाफिज सईदविरोधात अशांतता पसरवण्याबाबत पुरेस पुरावे प्राप्त आहेत. शिवाय त्याच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे".
कुख्यात दहशतवादी आणि 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदला 30 जानेवारीपासून लाहोर येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे अमेरिकेकडून देण्यात आले होत. या निर्णयामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचं दिसून आले होते. यावर "राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांतर्गत हाफिज सईदवर नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे", असा कांगावा पाकिस्तानी सैन्याने केला होता. शिवाय या निर्णयाला पाकिस्तानची कमजोरी समजू नका, अशा फुशारक्याही पाकिस्ताननं मारल्या होत्या.
दरम्यान, अमेरिकेनं हाफिज सईदचा मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केल होता. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणा-या व्यक्तीला एक कोटी डॉलरचे बक्षीसही घोषित केले होते.