लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : “काही वर्षांपूर्वी मी ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘लोकल फॉर ग्लोबल’ ही कल्पना देशासमोर मांडली होती आणि आज आपण ही कल्पना प्रत्यक्षात उतरताना पाहत आहोत. अनेक दशकांपासून जग भारताला आपले ‘बॅक ऑफिस’ म्हणत आहे. आता भारत जगाचा नवा कारखाना बनत आहे. आपण एक जागतिक शक्ती बनत आहोत,” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते ‘एनएक्सटी’ परिषदेत ‘न्यूजएक्स वर्ल्ड’ चॅनेलचे उद्घाटन करताना मोदी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेचे आता यश येत आहे, कारण भारतीय उत्पादने जागतिकस्तरावर पोहोचत आहेत आणि जगभरात त्यांची उपस्थिती जाणवत आहे.
पंतप्रधान काय म्हणाले...
पंतप्रधान म्हणाले की, भारताचे वाढते संरक्षण उत्पादन जगासमोर त्याचे अभियांत्रिकी आणि तांत्रिक कौशल्य प्रदर्शित करते. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ऑटोमोबाइल क्षेत्रापर्यंत, जगाने भारताचे प्रमाण आणि क्षमता पाहिली आहे. भारत केवळ जगाला उत्पादने पुरवत नाही तर जागतिक पुरवठा साखळीत एक खात्रीशीर आणि विश्वासार्ह भागीदार बनत आहे.
बजेट अंमलबजावणी, मार्ग सुचवा!
कृषी आणि ग्रामीण विकासासाठी चालू योजना अधिक प्रभावी करण्यासाठी आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान म्हणाले की, शेती विकासाचे पहिले इंजिन मानले जाते. सरकार कृषी विकास व ग्रामीण समृद्धी साध्य करण्याच्या ध्येयाने पुढे जात आहे. अर्थसंकल्प तयार झाला. भागधारकांनी अंमलबजावणीतील ‘अडथळे आणि कमतरता’ ओळखल्या पाहिजेत.