नवी दिल्ली - चांद्रयान, मंगलयान या यशस्वी मोहिमांनंतर इस्रोची चांद्रयान-२ मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. त्याबरोबरच इस्रो अजून एक मोठी मोहीम हाती घेणार आहे. अंतराळामध्ये स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची तयारी इस्रोने केली आहे. ह्युमन स्पेस मिशननंतर आपण गगनयान मोहीम चालू ठेवली पाहिजे. त्यासाठी भारत आपले स्वत:चे अंतराळ स्थानक तयार करण्याची तयारी करत आहे, असे इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रयान 1 मोहीम यशस्वी झाल्यानंतर चांद्रयान 2 यशस्वी करण्यासाठी इस्रोची यंत्रणा सज्ज झाली आहे. यानंतर इस्रो सूर्य आणि शुक्रच्या दिशेनं उड्डाण करणार आहे. चांद्रयान 2 मोहिमेच्या तयारीची माहिती देताना केंद्र सरकार आणि इस्रोनं आगामी योजनांबद्दल भाष्य केलं. मिशन चांद्रयानसाठी 10000 कोटींचा खर्च येणार आहे. केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आज चांद्रयान 2 सह आगामी काळातील योजनांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून अंतराळ क्षेत्रात भारतानं महत्त्वपूर्ण मोहिमा पूर्ण केल्या असून येत्या काळात सूर्य आणि शुक्र हे इस्रोचं लक्ष्य असेल, असं सिंह यांनी सांगितलं. 'चांद्रयान-2 शनिवारी (15 जून) अवकाशात झेपावेल. या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतातच प्रशिक्षण देण्यात आलं आहे,' अशी माहिती इस्रोच्या प्रमुखांनी दिली.15 जूनला अंतराळात झेपावणारं चंद्रयान-2 म्हणजे चांद्रयान-1 मोहिमेचा पुढचा टप्पा असेल, असं जितेंद्र सिंह म्हणाले. इस्रोचं पुढील लक्ष्य सूर्य असेल. यासाठी मिशन सन राबवण्यात येईल, अशी माहिती के. सिवन यांनी दिली. सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध एक उपग्रह पाठवण्याची आमची योजना आहे. अंतराळ क्षेत्रात सर्वात आघाडीवर असलेला देश होण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. गगनयान मोहीम 2021 पर्यंत पूर्ण होईल. यानंतर 2023 मध्ये शुक्र मोहिमेची योजना आखण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. जागतिक तापमानवाढीच्या समस्येवरदेखील काम सुरू असल्याचं ते म्हणाले.
आता भारत स्थापन करणार स्वत:चे अंतराळ स्थानक, इस्रो प्रमुखांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 6:22 PM