नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा मंगळावर जाण्याची तयारी केली आहे. भारत आणखी एक यान या ग्रहावर पाठविण्यास तयार आहे, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नऊ वर्षांपूर्वी ‘इस्त्रो’ने पहिल्याच प्रयत्नात लाल ग्रहाच्या कक्षेत अंतराळ यान यशस्वीरीत्या पाठवणारी ‘इस्रो’ ही एकमेव अंतराळ संस्था होती.
मार्स ऑर्बिटर मिशन-२ला अनौपचारिकरीत्या ‘मंगळयान २’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेशी संबंधित तपशील समोर आले आहेत.
इस्रोने आखली दुसरी मोहिम
मंगळावर पाठविल्या जाणाऱ्या यानावर बसविण्यात येणारी विविध वैज्ञानिक उपकरणे विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत, असे ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
अनेक उपकरणे जाणार घेऊन
हे यान अत्याधुनिक रोव्हरसह मंगळावर उतरेल व चंद्रयान-३ प्रमाणे मंगळाचा अभ्यास करेल. हे यान विविध वैज्ञानिक उपकरणे स्वतःसोबत घेऊन जाणार असून, त्याद्वारे ते मंगळावरील वातावरण, पर्यावरण, आंतरग्रहीय धूळ व मंगळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहे.