Vande Bharat Express Train: देशभरातील अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रवाशांकडून वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत रेल्वे ट्रेनच्या तिकीटदरांत कपात करण्याचा निर्णय अलीकडेच भारतीय रेल्वेकडून घेण्यात आला. यानंतर आता लवकरच ४ मार्गांवर आठ डब्यांच्या मिनी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहेत. तर नजीकच्या काळात देशातील नवीन ४० मार्गांवर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रणालीमध्ये लवकरच महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. सध्याच्या वंदे भारत ट्रेनला १६ डबे आहेत. आगामी काही दिवसांमध्ये आठ डब्यांची वंदे भारत ट्रेन पाहायला मिळणार आहे. रेल्वे मंडळाने अशा गाड्या बनविण्याचे निर्देश चेन्नईतील इंटिग्रल कोच म्हणजेच ICF फॅक्टरीला दिले आहेत.
कोणत्या मार्गांवर नव्या वंदे भारत एक्स्प्रेस अपेक्षित?
सुरुवातीला दिल्ली-चंडीगड, चेन्नई-तिरुनेलवेली, लखनऊ- प्रयागराज आणि ग्वाल्हेर-भोपाळ या मार्गावर मिनी वंदे भारत सुरू करण्याची तयारी आहे. सर्वसामान्यांना परवडावे व त्यांनाही वंदे भारतमधून प्रवासाचा अनुभव मिळावा हा यामागचा उद्देश आहे, असे रेल्वेचे म्हणणे आहे. सध्याच्या वंदे भारत ट्रेनमधील दोन डबे ड्रायव्हर कॅब म्हणजे इंजिनचे डबे आहेत, तर दोन एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे आहेत. बाकीचे डबे एसी चेअर कार आहेत. (Mini Vande Bharat Express Train)
दरम्यान, अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांची संख्या रोडावलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मिनी वंदे भारत ट्रेनला चालना दिली जाणार आहे. ICF सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची बांधणी करत आहे. वेगवान प्रवासाच्या दृष्टीने वंदे भारत एक्स्प्रेस तयार करण्यात आली आहे. रेल्वे मंडळाने आता आयसीएफला स्लीपर कोच असणाऱ्या वंदे भारत ट्रेनची निर्मिती करण्याची सूचना केली आहे. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.