नवी दिल्ली – सीमा आणि सचिन यांची लव्हस्टोरी मागील १ महिन्यापासून देशभरात चर्चेत आहे. आता भारतातून अंजू नावाची महिला पाकिस्तानात पोहचली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही महिलांची कहाणी एकसारखीच आहे. या दोघींचे प्रेम सोशल मीडियावर भेटले. दोघींनी प्रियकराला भेटण्यासाठी देशाच्या सीमा ओलांडल्या. त्याचसोबत या दोन्ही महिला फरार झाल्याचे त्यांच्या पतींना तेव्हा कळाले जेव्हा या दोघी दुसऱ्या देशात पोहचल्या होत्या.
एकीकडे पाकिस्तानातून आलेली सीमा, सचिनच्या प्रेमात पडून चार मुलांसह नेपाळमार्गे नोएडाला पोहचली, तर दुसरीकडे ३५ वर्षीय अंजू राजस्थानच्या भिवाडीहून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाला पोहचली. अंजू त्याठिकाणी २९ वर्षीय प्रियकर नसरुल्लाहला भेटण्यासाठी गेली. या दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. सीमा-सचिन, अंजू-नसरुल्लाह या दोघांच्या प्रेमकहाणीत खूप साम्य आहे. ज्यापद्धतीने सीमा हैदर तिच्या पतीला न सांगताच भारतात आली. तसेच अंजूने पतीला जयपूरला जाते सांगून वाघा बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात पोहचली. प्रेमासाठी सीमाला सचिनचे प्रेम भारतात घेऊन आले त्याचरितीने अंजू नसरूल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानात गेली.
सीमाला पाकला जायचं नाही, पण अंजू....
या प्रेमकहाणीत आणखी साम्य म्हणजे दोघीही विवाहित आहेत, दोघींना मुले आहेत. सीमा आणि अंजू दोघांच्या पतीला पत्नीने घरी परत यावे असं वाटते. त्याशिवाय सीमा आणि अंजू दोघीही प्रियकरापेक्षा वयाने मोठ्या आहेत. सीमाचे वय ३० आणि सचिनचे वय २२ आहे. तर अंजूचे वय ३५ आणि नसरूल्लाहचे वय २९ आहे. सीमा तिच्या मुलांना घेऊन भारतात आली मात्र अंजू मुलांना सोडून पाकिस्तानात गेली.
जयपूरला जायला निघाली थेट पाकिस्तानात पोहचली
अंजूची पाकिस्तानात जायची स्टोरीही रंजक आहे. अंजूचा पती अरविंदने सांगितले की, पत्नीने मला म्हटलं, मी दोन दिवसांसाठी जयपूरला जातेय, मुलांना घेऊन जात नाही. त्यानंतर अचानक रविवारी संध्याकाळी ४ वाजता तिने तिच्या बहिणीला फोन करून ती पाकिस्तानच्या लाहौर येथे असल्याचे सांगितले. तिथून २-३ दिवसात पुन्हा येईन असं म्हटलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजू कुणाशी तरी संपर्कात आहे हे मला आजतागायत माहिती नव्हते.
अंजूने ईसाई धर्म स्वीकारून अरविंदशी लग्न केले होते. या दोघांना २ मुले आहेत. अरविंद भिवाडी इथं खासगी नोकरी करतो तर अंजू एका कंपनीत डेटा ऑपरेटर आहे. भिवाडीत अरविंद १५ वर्षीय मुलगा, ६ वर्षीय मुलगी, अंजू आणि मेव्हणा हे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. अरविंदनुसार, अंजूने २०२० ला पासपोर्ट बनवला होता. परदेशात नोकरीसाठी अर्ज करायचा आहे असं ती सांगत होती.
पाकिस्तानी मीडियानुसार, अंजूचा फेसबुक प्रियकर नसरुल्लाह मेडिकल रिप्रेजेन्टिव्ह आहे. काही महिन्यापूर्वी दोघांची फेसबुकवरून ओळख झाली. भारतात सीमा हैदरवरून जी चर्चा सुरू आहे तशीच पाकिस्तानात अंजूबद्ल सुरू झालीय. अंजूचीही चौकशी तपास यंत्रणांकडून सुरू आहे. मात्र अंजू व्हिसा घेऊन पाकिस्तानात पोहचली आहे. सुरुवातीला पोलिसांनी तिची चौकशी करून सोडून दिले. सध्या तपास यंत्रणेचे अधिकारी नसरुल्लाहच्या घरीच थांबले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आसपास पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.