ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 4 - ब्रिटनमध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. शिक्षण, रोजगाराच्या संधी यामुळे दरवर्षी हजारो भारतीय ब्रिटनमध्ये जात असतात. पण आता ही संख्या रोडावण्याची शक्यता आहे. देशात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराला चाप लावण्यासाठी ब्रिटनने व्हिसा धोरणात बदल केला असून, युरोपियन समुदायाबाहेरील नागरिकांसाठी व्हिसासंबंधीचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नियमाचा सर्वाधिक फटका भारतीय आणि भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
या बदललेल्या नियमांबाबतची घोषणा ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने केला आहे. या नियमावलीनुसार 24 नोव्हेंबरनंतर एकाच कंपनीअंतर्गत बदलीसाठी आयसीटी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा 20 हजार 800 पौंडावरून 30 हजार पौंड करण्यात आली आहे. आयसीटी व्हिसाचा वापर करून ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांमध्ये 90 टक्के भारतीय असतात. त्यामुळे या नियमातील बदलाचा फटक सर्वाधिक प्रमाणात भारतीयांनाच बसणार आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भारत दौऱ्यापूर्वीच काही दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याबरोबरच ब्रिटनचे नागरिकत्व मिळवण्यासाठीही आता कडक परीक्षा द्यावी लागणार आहे. नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या युरोपियन देशांबाहेरील नागरिकांची इंग्रजीची अधिक आव्हानात्मक परीक्षा घेण्यात येणार आहे.