हैदराबाद : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घालते आहे. परिस्थिती अशी आहे, की कोरोनाचे नुसते नाव जरी घेतले तरी लोकांच्या भुवया उंचावतात. मात्र, असे असले तरी, या जीवघेण्या आजारापासून सतर्क राहून आपण आपलाच नाही, तर इतरांचाही जीव वाचवू शकतो. हा संदेश देण्यासाठी आता कोरोना हेल्मेट आणि कोरोना मिठाईनंतर चक कारच रस्त्यावर उतरली आहे. आता हैदराबादच्या रस्त्यांवर कोरोना कार फिरताना दिसता आहे. या जीवघेण्या व्हायरससंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी ही कार तयार करण्यात आली आहे. ही कार हैदराबादमधील के. सुधाकर यांनी तयार केली आहे. ते अशाच पद्धतीच्या अनोख्या कार तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सुधाकर यांनी बुधवारीच ही कार रस्त्यावर उतरवली.
कारला १०० सीसीचे इंजिन -
के. सुधाकर हे हैदराबादमधील 'सुधा कार' संग्रहालयाचे मालक आहेत. या वन सिटर कारला 100 सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे. याशिवाय फायबर बॉडीने तयार केलेल्या या कारला सहा चाकं आहेत. ही कार जवळपास 40 किलोमीटर प्रती तास वेगाने चालू शकते.
सुधाकर म्हणाले, की ही कार तयार करण्यासाठी एकूण १० दिवस लाकले आहेत. लोकांनी घरातच थांबावे आणि सरकारच्या आदेशाचे पालन करावे. यासाठी कोरोना व्हायरससंदर्भात लोकांना जागरूक करणे हा आमचा ही कार तयार करण्यामागचा हेतू आहे. कोरोनासंदर्भात जनजागृती करण्याच्या कामात आपला हातभार लागावा यासाठी, ही कार पोलिसांना देण्याची त्यांची योजना आहे.