डेहराडून/ शिमला/ राजौरी : उत्तराखंड, हिमाचल प्रदेशपाठोपाठ वणव्याने काश्मिरातही जंगलाचा मोठा भाग गिळंकृत केला आहे. दरम्यान, या आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी ही आग लाकूड तस्करांकडून लावण्यात आल्याचा संशयही व्यक्त होत आहे. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात आग विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला, तर हिमाचल प्रदेशात कसोली येथे एका शाळेलाही आगीची झळ बसली. तातडीने येथील तब्बल ६00 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जंगलांतील वणव्यांमुळे उत्तराखंडच्या पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. जंगलांतील वणव्यांमुळे हिमनद्या वितळण्याचा धोका यामुळे निर्माण झाला आहे. उत्तराखंडमधील आगीमुळे सैरभैर झालेले वन्य प्राणी आता नागरी वस्त्यांकडे वळण्याची भीतीही आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. उत्तराखंडमध्ये तब्बल तीन हजार हेक्टरवरील क्षेत्र या आगीने घेरले आहे. जंगलातील वस्त्या, झोपड्या आणि तात्पुरते निवारे यांनाही वणव्याची झळ बसली आहे. वणवा कशामुळे? हा वणवा कसा लागला, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. या प्रकरणात सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून ४६ गुन्हे राज्यात दाखल करण्यात आले आहेत. यामागे लाकडाचा व्यवसाय करणारे व्यापारी असण्याची शक्यता आहे. वणव्यामुळे उत्तराखंडचा पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या ढगफुटीने येथील पर्यटन व्यवसाय कोलमडलेला असताना आता आगीचे नवे संकट उभे ठाकले आहे. उत्तराखंडला नोटीस : हिमाचल प्रदेश व उत्तराखंड आगीच्या मुद्द्यावरुन मंगळवारी राष्ट्रीय हरित लवादाने या दोन राज्य सरकारांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. हा मुद्दा अतिशय गंभीर असताना या सरकारांनी हे प्रकरण अतिशय सहजतेने घेतल्याची चिंता हरित लवादाने व्यक्त केली आहे. आगीवर नियंत्रण पौडी आणि नैनितालमध्ये वायूदलाचे हेलिकॉप्टर जंगलात पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. आतापर्यंत ४५ हजार लीटर पाणी जंगलात टाकण्यात आले आहे.
आता काश्मिरातही वणव्याचे तांडव
By admin | Published: May 04, 2016 2:11 AM