ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - पंजाब, गोव्यापाठोपाठ दिल्लीमध्येही आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पुढची राजकीय वाटचाल अतिशय खडतर बनली आहे. त्यांना पक्षांतर्गत असंतोषाचा सामना करावा लागणार असून, पक्षफुटीचा धोकाही त्यांच्यासमोर आहे. पाचवर्ष पूर्ण होण्याआधीच जनतेचे नायक बनलेले केजरीवाल थट्टेचा विषय बनले आहेत. केजरीवाल स्वत:च या सर्व परिस्थितीला जबाबदार आहेत. त्यांच्या पराभवाला चार प्रमुख कारणे आहेत.
1) अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात एखादी गोष्ट जाते तेव्हा ते स्वत:चे आत्मपरिक्षण करायला कधीही तयार नसतात. पराभव खिलाडूवृत्तीने मान्य करण्याऐवजी दुस-यावर बोट दाखवतात. यावेळी आपने पराभवासाठी ईव्हीएममशीनला जबाबदार धरले आहे.
2) दिल्ली महापालिकांचे निकाल विरोधात गेले तर, आपण पुन्हा आंदोलनाचे जुने राजकारण सुरु करु असा इशारा केजरीवालांनी दिला आहे. ईव्हीएममशीन्स विरोधात आंदोलन करण्याचे आपने ठरवले आहे. ईव्हीएममुळेच आपला पराभव झाला असा आपचा दावा आहे. पण केजरीवालांना या आंदोलनात लोकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यताच नाही. कारण त्यांना जनतेनेच मतपेटीतून जागा दाखवली आहे आणि यापूर्वी जेव्हा दिल्लीमध्ये ते सत्तेत आले तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा नव्हता का ? या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावी लागतील.
3) केजरीवाल भाजपा विरोधी महाआघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यामुळे काही काळापुरता का होईना त्यांचे राजकीय महत्व टिकून राहिल. या महाआघाडीमध्ये सहभागी होण्याचा आपला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
4) सद्य परिस्थितीत केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होऊन मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. पक्षबांधणीवर लक्ष द्यावे. ज्यांना पक्षातून बाहेर काढलेय त्यांना पुन्हा पक्षात स्थान द्यावे. नवे चेहरे लोकांसमोर आणावेत. जेणेकरुन लोकांमध्ये आपबद्दल विश्वास निर्माण होईल.