आता आणखी एक पक्ष भाजपाची साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार
By बाळकृष्ण परब | Published: October 25, 2020 06:30 AM2020-10-25T06:30:04+5:302020-10-25T06:47:01+5:30
BJP News : भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गेल्या काही दिवसांपासून लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
नवी दिल्ली - भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गेल्या काही दिवसांपासून लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आधी शिवसेना, नंतर अकाली दल आणि गोरखा जनमुक्ती मोर्चानंतर आता अजून एका पक्षाने भाजपाची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे. केरळमधीलकेरळ काँग्रेस (पी. सी. थॉमस गट) ने रविवारी एनडीएला अधिकृतरीत्या सोडचिठ्ठी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
केरळ काँग्रेसचे नेचे पीसी थॉमस यांनी सांगितले की, रविवारी एनडीए सोडण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. एनडीएने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्हाला कुठलीही जागा देण्यात आली नाही. आमच्याकडे एनडीए सोडण्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग उरलेला नाही. आम्ही रविवारी त्याबाबत अधिकृत घोषणा करू. काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी यूडीएफमध्ये आमचे स्वागत केले आहे. आम्ही उद्या आपल्या निर्णयाची घोषणा करू.
यापूर्वी बुधवारी पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चाने एनडीएपासून फारकत घेण्याची घोषणा केली होती. दार्जिलिंगमध्ये वेगळ्या राज्यासाठी झालेल्या आंदोलनापासून फरार असलेले गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी याबाबतची घोषणा केली होती. केंद्र सरकार या पर्वतीय क्षेत्रासाठी कायमस्वरूपी राजकीय समाधान शोधण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता.
तत्पूर्वी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे नाराज झालेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनीही मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. तत्पूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या तिढ्यानंतर शिवसेनेने भाजपाशी असलेली मैत्री तोडली होती.