'MBBSने सुरुवात, इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षणही मातृभाषेतून होणार', अमित शहांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 02:04 PM2022-10-16T14:04:56+5:302022-10-16T14:19:54+5:30
देशात पहिल्यांदाच मध्य प्रदेश सरकारने MBBSचे शिक्षण हिंदीत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
भोपाळ: देशात प्रथमच मध्य प्रदेशमध्ये हिंदी भाषेतून एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी रविवारी त्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी प्रथम वर्षाच्या मेडिकलच्या हिंदी पुस्तकांचे प्रकाशन केले. भोपाळच्या लाल परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग, भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा आणि इतर मंत्री आणि नेते उपस्थित होते. यासह, मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे जिथे एमबीबीएसचे शिक्षण आता हिंदीतूनही घेण्यात येणार आहे.
Madhya Pradesh | Home Minister Amit Shah launches the country's first Hindi version of MBBS course books, in Bhopal in the presence of CM Shivraj Singh Chouhan and State Medical Education Minister Vishvas Kailash Sarang pic.twitter.com/QezQ9bFgFv
— ANI (@ANI) October 16, 2022
यावेळी अमित शाह म्हणाले की, 'आजचा दिवस भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इतिहासात आजच्या दिवसाची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल. नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण, तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात मातृभाषेला महत्त्व देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशात सर्वप्रथम हिंदीतून वैद्यकीय शिक्षण सुरू करून शिवराज सिंह यांच्या सरकारने पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली आहे. आजचा दिवस मातृभाषेचे समर्थक असलेल्यांसाठी अभिमानाचा आहे. तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात हिंदी अभ्यासक्रम सुरू करून भाजप सरकारने इतिहास रचला आहे.
MP | BJP's Shivraj Singh Chouhan govt, by starting medical education in Hindi for the first time in the country, has fulfilled PM Modi's wish: Home Minister Amit Shah at the launch of Hindi MBBS course books in Bhopal pic.twitter.com/sWeEmhOEEH
— ANI (@ANI) October 16, 2022
सर्व प्रकारचे शिक्षण मातृभाषेत होईल
अमित शहा पुढे म्हणतात की, हा क्षण देशातील शिक्षण क्षेत्राच्या पुनर्रचनेचा क्षण आहे. वैद्यकीय अभियांत्रिकीमध्ये मातृभाषेचे समर्थन करणाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. आता आम्हाला आमच्याच भाषेत शिक्षण मिळेल. भाषेमुळे एकही मुलगा वंचित राहणार नाही. सरकारच्या या प्रयत्नाने हे पाऊल अशक्य म्हणणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिले आहे. कोणत्याही व्यक्तीची विचार करण्याची प्रक्रिया त्याच्या मातृभाषेतूनच घडते. नेल्सन मंडेला म्हणाले की, एखाद्या व्यक्तीशी त्याच्या मातृभाषेत बोलले तर ती गोष्ट त्याच्या हृदयापर्यंत पोहोचते. जगभरातील शिक्षणतज्ञांनी मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले आहे. भारतातही वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कायद्याचे शिक्षण हिंदीसह देशातील विविध राज्यांतील मातृभाषेतून होईल.
शिवराज यांचा काँग्रेसवर निशाणा
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, हिंदी माध्यमात शिकणारी आपल्या ग्रामीण भागातील मुले इच्छा असूनही डॉक्टर बनू शकत नाहीत, कारण इंग्रजी भाषा ही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात सर्वात मोठा अडथळा ठरते. आता हिंदी माध्यमाची मुलेही मध्य प्रदेशात डॉक्टर होऊ शकणार आहेत. स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी देशात ब्रिटिशांची मानसिकता संपू दिली नाही. मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा संपवण्याची भूमिका त्यांनी बजावली.
अशा लोकांमुळे देशात इंग्रजी भाषेचे साम्राज्य वाढले. देशात असे वातावरण निर्माण केले गेले की ज्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अशिक्षित समजले जाते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ही भाषिक मानसिकता बदलली आहे. जगातील कोणत्याही देशात जा, तेथील स्थानिक भाषांमध्ये शिक्षण दिले जाते, पण इंग्रजी मानसिकतेच्या लोकांनी भारतात हिंदीला कधीच वाढू दिले नाही.