अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असताना त्यांच्याच राज्यात गुजरातमधील मेहसणा जिल्ह्याच्या एका गावात अल्पवयीन मुलींना मोबाईल फोन बाळगणे आणि त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मोबाईलमुळे मुलींचे अभ्यासातून लक्ष विचलित होते, असा दावा ही बंदी घालणाऱ्यांनी केला आहे. ही बंदी केवळ शाळकरी विद्यार्थिनींपुरतीच मर्यादित असून महाविद्यालयीन विद्यार्थीनींना यातून सवलत देण्यात आली आहे. अलीकडेच उत्तरप्रदेशातील एका गावातही अशीच बंदी घालण्यात आली आहे. काडी तालुक्यातील सूरज गावच्या पंचायतीने हे निर्बंध लादले आहेत. अल्पवयीन मुलींजवळ मोबाईल दिसल्यास त्यांना २१०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या आई-वडिलाच्या मोबाईल फोनचा वापर करता येणार आहे पण फक्त घरात व तो त्यांच्याच देखरेखीखाली. त्यांना मोबाईल घेऊन गावात फिरता येणार नाही. गावाचे सरपंच देवशी वांकर यांच्या म्हणण्यानुसार मोबाईल फोन मुली आणि त्यांच्या आईवडिलांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे बहुतांश गावकऱ्यांचे मत असल्याने सर्व सहमतीने हा निर्णय घेण्यात आला. तरुण प्रेमीयुगुल घरातून पळून जाण्यासाठीही सेलफोनचा वापर करीत असल्याचा निष्कर्ष पंचायतीने काढला आहे. दलित, पटेल, ठाकूर, रबाडी अशा सर्व समुदायाच्या लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना चांगल्या वाईटाची समज असते. शिवाय गावात कॉलेज नसल्याने त्यांना जवळच्या शहरांमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीत आईवडिलांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांना मोबाईलची गरज असते. त्यामुळे त्यांना या बंदीतून वगळण्यात आले असल्याचे वांकर यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)मोबाईल फोनमुळे मुलींचे अभ्यासातून मन विचलित होते. त्या तासन्तास गेम खेळत बसतात आणि अभ्यासात लक्ष घालत नाहीत.मोबाईलच्या वापरामुळे त्यांच्या गरीब आईवडिलांवर विनाकारण आर्थिक बोजा पडतो. अलीकडील काळात अल्पवयीन मुलींचे मुलांसोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून यालाही मोबाईलच जबाबदार आहे.नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या बैठकीत मुले मोबाईलच्या माध्यमाने मुलींच्या संपर्कात राहात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सोईचा गैरवापर ते पळून जाण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. - रामजी ठाकूर, माजी सरपंच
आता गुजरातमधील गावात मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी!
By admin | Published: February 23, 2016 1:23 AM