ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - स्मार्ट सिटीमध्ये राहणा-या नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून एक खूशखबर. मोदी सरकार लवकरच तुमच्या घराचे भाडे चुकवणार आहे. केंद्र सरकार 100 स्मार्ट सिटीत लवकरच 2700 कोटी रुपयांची नवीन कल्याणकारी योजनेची सुरुवात करणार आहे.
या योजनेअंतर्गत शहरातील गरीबांच्या घराचे भाडे चुकवण्यासाठी केंद्र सरकारकडून कूपन दिले जाणार आहेत.
दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी केंद्र सरकार या कूपन योजनेसहीत नवीन गृहनिर्माण धोरणही सादर करण्याची शक्यता आहे.
तसं पाहायला गेले तर, स्मार्ट सिटीमधील गरीबांच्या घराचं भाडं देण्याच्या धोरणावर गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र 2017-18 वर्षात ही योजना लागू होईल, अशी माहिती आहे. स्मार्ट सिटीमध्ये ही योजना लागू करण्यात आल्यानंतर प्रत्येक वर्षी 2,713 कोटी रुपये एवढा खर्च येण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या योजनेमुळे गरीब, मजुरांना मोठ्या प्रमाणात मदत होईल. शहरातील महापालिकांच्या सहाय्याने घर भाड्यांच्या कूपनचे गरीबांमध्ये वाटप केले जाईल. शहर आणि घराचा आकार या हिशेबाने कूपनची किंमत ठरवण्याचे काम महापालिकेकडे सोपवण्यात येईल. जर घराचं भाडं कूपनमधील किंमतीपेक्षा अधिक असेल तर उर्वरित रक्कम भाडेकरुला आपल्या खिशातून भरावी लागणार आहे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.
गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयातील एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांची 'हाऊसिंग फॉर ऑल' योजनेला पुरक म्हणून या कूपन योजनेकडे पाहिले जात आहे. शिवाय, केंद्र सरकार जप्त केलेल्या बेनामी मालमत्तेचा स्वस्त घरं बनवण्यासाठी वापर करणार असल्याने घरांची कमतरताही भासणार नाही.
एकूण ही योजना लागू झाल्यास सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळेल.