Rahul Gandhi Speech News : "देशात भाजप आणि आरएसएसचे लोक द्वेष आणि हिंसा पसरवत आहेत. त्यांचे काम द्वेष पसरवण्याचे, तर आपले काम प्रेम पसरवण्याचे आहे. ते तोडतात, तर आपण जोडतो. द्वेषाला प्रेमाने हरवता येऊ शकते. पूर्वी पंतप्रधान मोदी छाती फुगवून चालायचे. आता झुकून चालतात", असे म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र डागले.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी दौऱ्यावर असून, रामबाण येथे झालेल्या सभेत त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.
राज्याचा दर्जा परत करावा लागेल -राहुल गांधी
"एक राज्य संपवले गेले आणि लोकांचे अधिकार हिरावून घेतले गेले. सर्वात आधी जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा परत करावा लागेल. कारण फक्त तुमचे राज्य हिरावून घेतले गेले नाहीये, तर तुमचे अधिकार, तुमची संपत्ती आणि तुमचे सर्वकाही हिरावून घेतले जात आहे", असे राहुल गांधी म्हणाले. "आज जम्मू काश्मीरमध्ये राजा आहे, त्याचे नाव एलजी (उपराज्यपाल) आहे. राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकू", असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
सरकार अदाणी-अंबांनींना फायद्यासाठी काम करतय -राहुल गांधी
भाजप प्रणित एनडीए सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "सरकार फक्त अदाणी आणि अंबानींच्या फायद्यासाठी काम करत आहे. जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या इतर भागाच्या तुलनेत जास्त बेरोजगारी आहे. मोदीजी, कधी समुद्रात जातात. कधी लोकांना अलिंगन देता, पण कधीच बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलत नाहीत", अशी टीका राहुल गांधींनी केली.
"आता नरेंद्र मोदीजी, भारतीय जनतेला घाबरू लागले आहेत. आता थोडाच काळ शिल्लक राहिला आहे. आम्ही नरेंद्र मोदी आणि भाजपचे सरकार हटवू. देशात बंधूभाव असावा, सर्वांचा आदर केला जावा, सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावे, अशी आमची इच्छा आहे", असे राहुल गांधी म्हणाले.