नवी दिल्ली : विविध वर्गवारीतील देशभरातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिक सन्मान पेन्शन योजनेनुसार दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये केंद्र सरकारने सरासरी २० टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ दरमहा सुमारे पाच हजार रुपयांची असेल. याखेरीज स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळेल व त्यात सहामाही सुधारणा होईलकेंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पेन्शनच्या सुधारित दरांना मंजुरी दिली. पेन्शनमधील ही वाढ व महागाईभत्त्याची सुधारित पद्धत यंदाच्या १५ आॅगस्टपासून लागू मानली जाईल. यानुसार पेन्शनचे वितरण संबंधितांच्या ‘आधार’शी संलग्न खात्यांतूनच करावे, असे निर्देशही सर्व संबंधित बँकांना देण्यात आले आहेत. गेल्या पाच दशकांत या योजनेनुसार एकूण १,७१,६०५ स्वातंत्र्यसैनिक व पात्रता निकषांत बसणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मंजूर करण्यात आले. सध्या ३७,९८१ स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळतो. त्यापैकी ११,६९० प्रत्यक्ष स्वातंत्र्यसैनिक आहेत, २४,७९२ त्यांच्या पत्नी किंवा पती आहेत तर १,४९० पात्र मुली आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)सुधारित पेन्शन..अंदमानमध्ये काळ््या पाण्याची शिक्षा भोगलेले राजबंदी किंवा त्यांच्या पत्नी वा पती- रु. ३०, ०००. ब्रिटिश इंडियाच्या बाहेरून स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्लेले स्वातंत्र्यसैनिक वा त्यांच्या पत्नी अथवा पती- रु. २८,०००. आझाद हिंद सेनेचे सैनिक व इतर स्वातंत्र्यसैनिक- रु. २६,०००. स्वातंत्र्यसैनिकांवर अवलंबून असलेले त्यांचे पालक किंवा पात्रता निकषांत बसणाऱ्या जास्तीत जास्त तीन मुली- प्रत्यक्ष स्वातंत्र्यसैनिक हयात असता तर त्याला जेवढे पेन्शन मिळाले असते त्याच्या ५० टक्के पेन्शन.
स्वातंत्र्यसैनिकांना आता जादा पेन्शन
By admin | Published: September 22, 2016 6:00 AM