नवी दिल्ली- ट्रिपल तलाकविरोधात लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हज यात्रेसंदर्भात मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. पुरुषांशिवाय महिला हज यात्रेला जाऊ शकत नसल्याची प्रथा अन्यायपूर्ण आहे. ही प्रथा आम्ही संपुष्टात आणल्यामुळे आता पुरुषांशिवायही महिला हज यात्रेला जाऊ शकतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये म्हणाले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वीच मला समजलं की, मुस्लिम महिलेला हज यात्रेला जाण्यासाठी पुरुषाची सोबत आवश्यक असल्याची प्रथा आहे. हे ऐकून मी आश्चर्यचकीत झालो. परंतु आता महिला एकट्याही हज यात्रेला जाऊ शकणार आहेत. आम्ही या नियमांत बदल केला आहे. यंदा 1300 मुस्लिम महिलांनी पुरुष सदस्याशिवाय हज यात्रेला जाण्यास अर्ज केला आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही हा भेदभाव कायम होता. मुस्लिम महिलांवर असा अन्याय कसा झाला, हे ऐकून मी हैराण होतो. त्यानंतर मीही प्रथा मोडीत काढली. महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीनं अधिकार मिळाले पाहिजेत, असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षाच्या शेवटच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2018 या वर्षाचं स्वागत सकारात्मकरीत्या होणार आहे. तरुणांचा नवा भारत जात-पात, दहशतवाद, भ्रष्टाचारापासून मुक्त असेल. स्वच्छता ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, स्वच्छता अभियानाची तपासणी 4 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत होणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.
आता मुस्लिम महिलांना हज यात्रेला एकट्यानं जाण्याचा अधिकार- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 1:11 PM