कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या घटनेवरून केंद्र सरकार आणि पंजाब सरकार आमने-सामने आले असताना, आता बंगालमध्ये एका रुग्णालयाच्या उदघाटनावरून ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदींमध्ये जुंपल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे असलेल्या चित्तरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या दुसऱ्या भागाचे आज व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून उदघाटन केले. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा उपस्थित होत्या. मात्र या कार्यक्रमामध्ये ममता बॅनर्जींनी व्यक्त केलेली नाराजी चर्चेत राहिली. नरेंद्र मोदी हे ज्या रुग्णालयाचे उदघाटन करत आहेत. त्याच्या कॅम्पसे आम्ही आधीच उदघाटन केले आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी सर्वप्रथम सूत्रसंचालकांवर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या आरोग्य मंत्र्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मला दोन वेळा फोन केला. मी विचार केला की, कोलकातामध्ये कार्यक्रम आहे. तसेच पंतप्रधानांनी रस घेतला आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असा विचार मी केला. मात्र मी पंतप्रधान मोदींना हे सांगू इच्छिते की, या रुग्णालयाचे उदघाटन मी आधीच केले होते. कोरोनाकाळात आम्हाला सेंटर्सची गरज होती. यादरम्यान, आम्ही पाहिले की, चित्तरंजन रुग्णालया राज्याशी संबधित आहे. अशा परिस्थितीत आम्ही याचे उद्घाटन केले. तसेच या रुग्णालयाला कोरोना सेंटर बनवले. ते आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरले.
ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, राज्य सरकार कॅन्सर रुग्णालयासाठी २५ टक्के निधी देत आहे. या रुग्णालयासाठी राज्य सरकारने ११ एकर जमीन दिली आहे. त्यामुळे जेव्हा जनतेचा विषय असतो. तेव्हा राज्य आणि केंद्राने एकत्र येऊन काम केले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी सांगू इच्छिते की, आमचे सरकार येण्यापूर्वी येथील आरोग्य सुविधा ह्या खूप खराब होत्या. आम्ही येथे महिला, मुलांसाठी आयसीयू रुग्णालय उभारले. त्या पुढे म्हणाल्या की, आमच्या राज्यामध्ये डोंगर, समुद्र आहे. जंगले आहेत. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा पोहोचवणे कठीण होते. आम्ही सर्वांना विचारात घेऊन योजनेंतर्गत काम केले.