नवी दिल्ली : देशावर गेल्या काही वर्षांपासून आस्मानी संकटांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. एकामागोमाग एक अशी संकटे येत आहेत. काश्मीर झाले की केरळ, इकडे गुजरात झाले की युपी, बिहार, पश्चिम बंगाल. परंतू एनडीआरएफ एकटेच आमच्या निम्म्या चिंता दूर करते, अशा शब्दांत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आपत्ती व्यवस्थापन दलांची स्तुती केली.
जेव्हा आमच्याकडे कोणत्याही संकटाचा अलर्ट येतो आणि आम्हाला जेव्हा समजते की एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तेनात झाले आहे, तेव्हा आमच्या निम्म्या चिंता संपलेल्या असतात. कारण आम्हाला आता एनडीआरएफ सर्व संकट सांभाळेल, असा विश्वास वाटतो. आपत्ती प्रतिसादासाठी क्षमता वाढवण्याच्या वार्षिक परिषदेला शहा संबोधित करत होते.
NDRF ने आता जगभरात प्राकृतिक संकटांच्या क्षेत्रात आपले नाव कमविले आहे. अनेकदा शेजारी देशांमध्ये जाऊनही या दलाने माणुसकी निभावली आहे. २०१६ मध्ये मोदींनी एनडीएमए आणि एनडीएमपी सुरु केले होते. केंद्र सरकार सर्व प्रकारच्या संकटांवर सतत काम करत आहे. आतापर्यंत २६ राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशांच एसडीआरएफची स्थापना झाली आहे, असे शहा म्हणाले.
देशात संसाधने आहेत म्हणून किंवा संशोधन करून काहीही होत नाही. तर प्रत्यक्षात संशोधनाची अंमलबजावणी करण्यासाठी एका शक्तीची गरज आहे. यासाठी एनडीआरएफ प्रशंसनीय काम करत आहे. 2001 च्या गुजरात भूकंपात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. 1999 मध्ये ओरिसामध्ये आलेले सुपर चक्रीवादळ देखील पाहिले, ज्यामध्ये हजारो लोक मरण पावले. आज आपण एनडीआरएफमुळे इतके सक्षम झालो आहोत की आता कितीही मोठे चक्रीवादळ आले तरी आम्ही त्याचा सामना करू, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.