आता अलाहाबादनंतर उत्तर प्रदेशातील आणखी एका मोठ्या शहराचे नाव लवकरच बदलणार आहे. अलीगडचे नाव हरिगड करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अलिगड महापालिकेत शहराचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव महापौर प्रशांत सिंघल यांनी मांडला होता. याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता केवळ उत्तर प्रदेश सरकारच्या हिरव्या झेड्याची प्रतीक्षा आहे.
काय म्हणाले महापौर? -अलीगडचे नाव बदलण्यासंदर्भात महापौर प्रशांत सिंघल म्हणाले, सोमवारी झालेल्या बैठकीत अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला होता. याला सर्व नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिला. आता हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. प्रशासन याकडे लक्ष देऊन आमची मागणी पूर्ण करेल, अशी आशा आहे. अलीगढचे नाव बदलून हरिगड करण्यासंदर्भात गेल्या बऱ्याच दिवसांपासून मागणी सुरू आहे.
2019 मध्येच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते संकेत -वर्ष 2021 मध्ये जिल्हा परिषदेच्या बैठकीत अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव मंजूर करून, तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तत्पूर्वी, 2019 मध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी, आपले सरकार राज्यभरातील ठिकाणांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू ठेवेल, असे संकेत दिले होते.
काय म्हणाले होते योगी? -योगी आदित्यनाथ म्हणाले होते, "आम्ही तेच केले, जे आम्हाला योग्य वाटले. आम्ही मुगल सरायचे नाव बदलून पंडित दीन दयाल उपाध्याय नगर, अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या जिल्हा केले. यापुढेही, जेथे आवश्यकता वाटेल, तेथे सरकार योग्य ती पावलं उचलेल."