नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात गेल्या कित्येक महिन्यांपासून मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता अनलॉक प्रक्रियेमध्ये हळूहळू इतर गोष्टींसोबतच मंदिरं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. भाविकांसाठी मंदिरं खुली करण्यात आली असून अनेक ठिकाणी ऑनलाईन दर्शन सुरू करण्यात आलं आहे. याच दरम्यान आता कोरोनाच्या काळात दर्शनासाठी मंदिरात पोहचू न शकणाऱ्या भाविकांसाठी भारतीय पोस्ट विभागाने एक विशेष सुविधा सुरू केली आहे.
पोस्ट खात्याच्या नव्या सुविधेमुळे घरबसल्या भक्तांना देवाचा प्रसाद मिळणार आहे. शबरीमाला मंदिरातील स्वामी प्रसाद घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोस्ट खात्याच्या मदतीने माता वैष्णोदेवी मंदिरासह शबरीमाला मंदिरातूनही प्रसाद भाविकांना घरपोच प्रसाद पाठविण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
एक व्यक्ती एका वेळेला दहा पाकिटे मागवू शकते
पोस्ट खात्याने 6 नोव्हेंबरपासून शबरीमाला मंदिराचा प्रसाद भाविकांना घरपोच देण्याची सुविधा सुरू केली आहे. यासाठी केरळ पोस्टल सर्कल आणि त्रावणकोर देवास्वम बोर्ड यांच्यात एक करार करण्यात आला आहे. यानुसार, कोणीतीही व्यक्ती 450 रुपये भरून या मंदिराचा प्रसाद घरी मागवू शकते. या प्रसादाच्या पाकिटात अर्वना, तूप, अंगारा (विभूती), हळद, कुंकू आणि प्रसाद असतो. एक व्यक्ती एका वेळेला दहा पाकिटे मागवू शकते. यासाठीची नोंदणी करताच स्पीड पोस्टचा एक मेसेज भाविकांना मिळतो. ज्यामुळे डिलिव्हरी कधी मिळणार याची माहिती मिळते.
9000 हून अधिक ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या
पोस्ट खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यत 9000 हून अधिक ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या असून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या वर्षीच्या मंडलम यात्रेसाठी भाविकांकरिता 16 नोव्हेंबरपासून शबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मात्र आता कोरोनाच्या महाभयंकर साथीमुळे अगदी मर्यादित संख्येत भाविकांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच दर्शनासाठी काही नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.