सीमा महांगडे
मुंबई : जगभरात प्लॅस्टिक वापराने मानवी जीवनाला निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी संशोधन केले जात आहे. तामिळनाडूच्या कोंगू इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गव्हाच्या कोंड्यापासून प्लेट्स बनविण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या विद्यार्थ्यांनी गव्हाच्या या खाण्यायोग्य प्लेट्स बनविण्यासाठीच्या मशीनचे संशोधन केले आहे. आयआयटी बॉम्बेच्या ई यंत्रा कॉम्पिटिशनमध्ये अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांचा हा प्रकल्प कौतुकाचा विषय ठरत आहे.
इरोड, तामिळनाडू येथील कोंगू इंजिनीअरिंग कॉलेजच्या मेकॅट्रॉनिक्स डिपार्टमेंटमधील विद्यार्थी मागील ३ महिन्यांपासून सतत या मशीनवर काम करत असून प्रोटोटाइप स्वरूपातील मशीन त्यांनी या स्पर्धेत आणली आहे. गव्हाच्या पिठाचा वाया जाणारा कोंडा हा पर्यावरणासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो याचे उत्तम उदाहरण या विद्यार्थ्यांनी मांडले आहे. शिवाय गव्हाच्या कोंड्यात आरोग्यासाठी लाभदायक असे पोषक घटक असल्याने ते आरोग्यासाठी चांगले असल्याचा निष्कर्ष या विद्यार्थ्यांनी मांडला. त्यामुळे आता जेवणानंतर गव्हाच्या कोंड्याची ती प्लेट खाल्ली तरी चालणार आहे. या प्लेट्स टिकण्याचा काळ सध्या ४ ते ५ दिवस इतका आहे. गव्हाच्या पिठाचा कोंडा आणि पाणी या गोष्टींचा वापर करून या प्लेट्स बनविण्यात येत असून संशोधन केलेल्या मशीनच्या साहाय्याने त्या तयार केल्या जातात. या प्लेट्स अधिक काळ टिकविता याव्यात म्हणून त्यामध्ये साखर किंवा मिठासारख्या संरक्षक मूलद्रव्यांचा वापर करता येणार असल्याची माहिती या विद्यार्थ्यांनी दिली.
के. कार्तिक, एस. बालसुब्रह्मण्यम, के. अरुणकुमार, एस. हरीहरन या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले असून सी. महेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आयआयटी ई यंत्राच्या अंतिम २१ स्पर्धकांमध्ये धडक दिली आहे. भविष्यात आर्थिक साहाय्य मिळाल्यास आपण नक्कीच हे संशोधन बाजारात आणून याचा वापर अधिकाधिक लोक करतील असा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया एस. बालसुब्रह्मण्यम या विद्यार्थ्याने दिली. आयआयटीच्या ई यंत्रामध्ये अंतिम फेरीत आलेल्या २१ प्रकल्पांचा निकाल शनिवारी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम संशोधने सादर केल्याची माहिती ई यंत्रा प्रकल्पाचे प्रमुख संशोधक प्राध्यापक कवी आर्या यांनी दिली.