मुंबई : नोटबंदीनंतर केवळ दोन हजाराच्या नोटांची छपाई मोट्या प्रमाणात झाल्याने देशभरात निर्माण झालेल्या गोंधळाची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आरबीआयने आता चुकांची दुरुस्ती करीत सकारात्मक पावले उचलली आहे. यापुढे सध्या ५०० रुपये व त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांची छपाई करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे काही दिवसांत या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ‘आरटीआय’तर्गंत मागितलेल्या विचारलेल्या आरबीआयने ही माहिती दिली आहे. मात्र ५०० रुपयाच्या नोटाच्या छपाईसाठीचा अंदाजे खर्च अद्याप निश्चित करण्यात आला नसल्याचे त्यांनी कळविले आहे. हजार व पाचशेच्या नोटाबंदी निर्णयानंतर बाजारात केवळ दोन हजार रुपयाच्या नव्या नोटा आल्या होत्या. त्याचे सुट्टे उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे गलगली यांनी नोटाबंदीच्या पूर्वी व नंतर नवीन चलनाच्या मुद्रणाबाबतची माहिती मागितली होती. त्याबाबत भारत प्रतिभूति मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड व भारतीय रिजर्व बैंक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जनमाहिती अधिकारी के.पी. श्रीवास्तव यांनी कळविले की, ५०० व त्याहून कमी मूल्याच्या नोटांची छपाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ५०० रुपयाच्या नोटाच्या मुद्रणावर अंदाजे खर्च अद्याप निश्चित नाही. वास्तविक आरबीआयने ८ नोव्हेंबरपूर्वी ५०० व त्याहून कमी मूल्याच्या नोटा छापल्या असत्या तर सामान्यांना बॅँकेच्या रागेत उभे रहाणे, आणि नागरिकांचा मृत्यू होण्याच्या दुर्घटना टळल्या असत्या, असे गलगली यांनी म्हटले आहे.(प्रतिनिधी)
आता केवळ ५०० व कमी मूल्यांच्या नोटांची छपाई सुरू
By admin | Published: January 04, 2017 1:02 AM