नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाराच्या प्रकरणांवरून केलेल्या कारवायांमुळे खळबळ उडालेली आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती. तर महाराष्ट्रातील मातब्बर नेते शरद पवार यांच्याविरोधात शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा नोंदवला होता. आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे ईडीच्या रडारवर असून, मनीलाँड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी वाड्रा यांना ताब्यात घेण्यास परवानगी देण्याची विनंती ईडीने दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे. आता या प्रकरणी 5 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.मनी लाँड्रिंगच्या काही प्रकरणांमध्ये रॉबर्ट वाड्रा यांचा थेट संबंध आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची चौकशी करायची आहे. सध्या रॉबर्ट वाड्रा हे तपासकार्याला पुरेसे सहकार्य करत नाही आहेत, असे ईडीने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले. लंडनमधील 12, ब्रायनस्टन स्क्वेअर येथील 17 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या खरेदीमध्ये मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी सुरू आहे. दरम्यान, वाड्रा यांचा पैशांच्या देवघेवीमध्ये थेट संबंध आहे. त्यामुले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करायची आहे, असे ईडीच्या वकिलांनी न्यायमूर्तींना सांगितले. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांनी ईडीच्या वकिलांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. ईडी माझ्या अशिलाला जेव्हा जेव्हा बोलावते. तेव्हा ते त्यांच्यासमोर हजर होतात. तसेच तपासामध्येही संपूर्ण सहकार्य करतात. आतापर्यंत ईडीने जे प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे माझ्या अशिलांनी दिली आहे. मात्र आरोप मान्य न करणे याचा अर्थ तपासाला सहकार्य करत नाहीत, असा होत नाही, असा टोलाही वाड्रा यांच्या वकिलांनी लगावला. दरम्यान, दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 5 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
आता रॉबर्ट वाड्रा ईडीच्या रडारवर, दिल्ली हायकोर्टाकडे मागितली कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 3:36 PM