नवी दिल्ली - काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर काँग्रेसनेते राहुल गांधी यांना सर्वाधिक विश्वास होता. त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर असलेला विश्वास वेळोवेळी बोलूनही दाखवला होता. मात्र शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाराजी झालेल्या राहुल यांनी ज्योतिरादित्य शिंदे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबतचा फोटो रिट्विट केला. त्यांच्या रिट्विटनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा फोटो चर्चेत आला आहे.
दीड वर्षापूर्वी राहुल यांनी सुप्रसिद्ध रशियन लेखक लियो टॉलस्टॉय यांच्या दोन सर्वात शक्तीशाली योद्धे म्हणजे धैर्य आणि वेळ, या ओळींसह मुख्यमंत्री कमलनाथ आणि शिंदे यांचा फोटो शेअर केला होता. आता पुन्हा एकदा राहुल यांनी तोच फोटो रिट्विट केला. या फोटोला अनेकजन रिट्विट करत आहेत.
त्यावेळी कवी संपत सरल यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा फोटो शेअर केला होता. मला या दोघांपेक्षा मोठे योद्धे दिसत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम यांना सांभाळा, असा सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता.
मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्ये देखील पायलट-गेहलोत यांच्यात मतभेद आहेत. सचिन पायलट यांनी अनेकदा गेहलोत यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपली नाराजी आधीच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. अशा स्थितीत पालयट यांनी शिंदेंसारखा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम काँग्रेसवर होऊ शकतो. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासमोर येणाऱ्या काळात या दोन्ही नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचे आव्हान असणार आहे.