नवी दिल्ली - व्हॉट्स अॅपवर येणाऱ्या अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेजमुळे तुम्ही हैराण आहात?. पण या तणावामुळे आता स्वतःला कोणताही त्रास करुन घेण्याची काहीच आवश्यकता नाहीय. विनाकारण त्रास देणाऱ्यांना आता दणका देण्याची वेळ आली आहे. अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांविरोधात आता तुम्हाला दूरसंचार विभागाकडे थेट तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार नोंदवल्यानंतर पुढील कारवाईसाठी तुमचा अर्ज दूरसंचार प्रदाते आणि पोलिसांकडे पाठवला जाईल. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्स अॅपवर येणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजविरोधात आता लोक न घाबरता दूरसंचार विभागाकडे आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. यासाठी पीडित व्यक्तीने संबंधित मोबाइल क्रमांकासहीत आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन ccaddn-dot@nic.in. वर मेल करावा.
दूरसंचार विभागचे संचार नियंत्रक (Communication Controller) आशीष जोशी यांनीही ट्विटरद्वारे सांगितले की, एखाद्या व्यक्तीला व्हॉट्स अॅपवर अश्लील, आक्षेपार्ह, जीवघेणी धमकी देणारे मेसेज येत असतील, तर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकासहीत आलेल्या मेजेसचा स्क्रीनशॉट घेऊन ccaddn-dot@nic.in. वर मेल करावा. पुढे त्यांनी असेही म्हटलंय, ''दूरसंचार सेवेचे प्रदाते आणि पोलीस अधिकाऱ्यांना समोर ठेऊन आम्ही आवश्यक त्या कारवाई करू. कित्येक पत्रकारांसहीत दिग्गजांनाही अश्लील आणि जीवघेण्या धमकीचे मेसेज येतात, अशा तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. यानंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे.''
आक्षेपार्ह, अनधिकृत, अश्लील, जीवघेण्या धमक्या किंवा अन्य प्रकारचे चुकीचे मेसेज पाठवण्यावर बंदी असल्याचे डीओटीनं 19 फेब्रुवारीला जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. शिवाय, चुकीचे मेसेज पसरवणाऱ्या ग्राहकांवर तात्काळ कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.