ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25- रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठी नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता रेल्वेची वेटिंग तिकीट आणि आरएसी (रिझर्व्हेशन अगेन कॅन्सलेशन) तिकीट 139 नंबर कॉल करून रद्द करता येणार आहे. मात्र कन्फर्म झालेल्या तिकीटच आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून किंवा 139 नंबर डायल करून रद्द होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. ही सुविधा आरएसी आणि वेटिंगच्या तिकिटांना लागू होणार आहे.
ब-याचदा तिकीट बुकिंग करताना अडचणी येतात. समजा एखादी तिकीट जरी बुक झाली आणि आपण ती रद्द केली. त्यावेळेसही रिफंड मिळवताना खूप त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे रेल्वेच्या 139 नंबरवर कॉल केल्यास लागलीच तिकीट रद्द होणार असून, प्रवाशांचा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे.
प्रवाशांना तिकीट रद्द करणं सोईस्कर व्हावं यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणालेत. मात्र रेल्वेचा बुकिंग चार्ट लागण्याच्या चार तास आधी 139 नंबरवर फोन केल्यासच तिकीट रद्द होणार आहे. तर आरएसी तिकीट बुकिंग चार्ट लागण्याच्या अर्धा तास आधी रद्द करता येणार आहे. तर दुसरीकडे रेल्वेनं प्रवाशांसाठी रेल्वेच्या काऊंटरवरही तिकीट रद्द करण्याचा पर्याय दिला आहे. रेल्वेच्या बजेटमध्ये रेल्वे मंत्र्यांनी हे आश्वासन दिलं होतं. आता रेल्वे प्रशासनानं ते पूर्ण केलं आहे, असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.