नवी दिल्ली - युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली आहे की, आता नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनद्वारे (NACO) दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारे सेक्स वर्कर्सना आधार कार्ड जारी केले जाईल. तसेच, आधार कार्ड जारी करण्यासाठी त्यांच्याकडे इतर कोणतेही अधिवास प्रमाणपत्र मागितले जाणार नाही. म्हणजेच आता सेक्स वर्कर्सना अॅड्रेस प्रूफशिवाय आधार कार्ड उपलब्ध करून दिले जाईल. (Aadhaar Card For Sex Workers)
महत्वाचे म्हणजे, UIDAI हे एक असे वैधानिक प्राधिकरण आहे, जे अर्जदाराचे नाव, लिंग, वय, पत्ता तसेच ईमेल किंवा मोबाईल नंबर सारखा पर्यायी डेटा सबमिट केल्यानंतरच आधार कार्ड जारी करते. मात्र, सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ने ही मोठी घोषणा केली आहे.
सेक्स वर्कर्ससाठी मोठी घोषणा -UIDAI ने सेक्स वर्कर्सच्या बाबतीत मोठी घोषणा करत आधार कार्ड जारी करण्यासाठी रहिवासाचा पुरावा न मागण्याचा निर्णय घेतला आहे. याला पर्याय म्हणून, UIDAI असे प्रमाणपत्र स्वीकारेल, जे NACO च्या राजपत्रित अधिकाऱ्याने (Gazetted officer) अथवा राज्याच्या आरोग्य विभागाने संबंधिताला दिलेले असेल.
कोर्टात सुरू आहे सुवावणी -याप्रकरणी गेल्या 2011 पासून सातत्याने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती एल. एन. राव हे संपूर्ण भारतात सेक्स वर्कर्सना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळण्यासंदर्भात मागणी करणाऱ्या याचिकेवर सुवावणी करत असतानाच, UIDAI ने यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर सर्टिफिकेटचा एक प्रस्तावित प्रोफॉर्मा ठेवला. संबंधित याचिकेत सेक्स वर्कर्सशी संबंधित अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. वेश्याव्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांसाठी पुनर्वसन योजना तयार करण्याच्या मुद्द्याचाही यात समावेश आहे.