(Image Credit : www.msn.com)
नवी दिल्ली : कोर्टाच्या एका निकालानुसार आता महिलांना मिडल फिंगर दाखवणे महागात पडू शकतं आणि याप्रकरणी तुरूंगाची हवाही खावी लागू शकते. एक व्यक्ती महिलेकडे बघून विचित्र हावभाव करत तिला मिडल फिंगर दाखवण्याप्रकरणी आणि त्रास देण्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सरू होती.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा निकाल देत असताना मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट(न्यायदंडाधिकारी) वसुंधरा आझाद म्हणाल्या की, 'अशाप्रकारचे हावभाव करत त्रास देणे हे महिलेच्या सन्मानाच्या विरोधात आहे'. आरोपी महिलेचा दीर होता. न्यायाधीश आझाद म्हणाल्या की, दोषीला जास्तीत जास्त तीन वर्षाचा तुरूंगवास आणि दंड भरावा लागू शकतो'.
महिलेने २१ मे २०१४ मध्ये तक्रार केली होती. महिलेने तक्रार केली होती की, आरोपीने मिडल फिंगर दाखवून घाणेरडी शेरेबाजी आणि मारझोडही केली. चौकशीनंतर पोलिसांनी कलम ५०९ आणि ३२३ नुसार तक्रार दाखल करून घेतली होती. ८ ऑक्टोबर २०१५ ला आरोपी विरोधात केस तयार केली होती.
आरोपीने कोर्टात स्वत:चा बचाव करताना दावा केला होता की, हा वाद जमिनीचा होता आणि त्याची बहिणही यात साक्षीदार होऊ शकते. आरोपीची बहीण म्हणाली की, तो दिवसभर घरीच होता आणि महिलेने त्याच्या विरोधात खोटी तक्रार केली आहे. दरम्यान न्यायाधिशांनी यावर लक्ष दिलं की, महिलेला मिडल फिंगर दाखवण्यासोबतच घाणेरडी शेरेबाजीही करण्यात आली.
कोर्टाला संपत्तीच्या वादाचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कोर्टाने आरोपीकडून देण्यात आलेली साक्ष रद्द ठरवली. कोर्टाने सांगितले की, आरोपी विरोधात सर्वच पुरावे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याला दोषी ठरवण्यात येत आहे. या आरोपीला शिक्षा मंगळवारी सुनावली जाणार आहे.