आता नाना पटोलेंचे समर्थक दिल्लीत; मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांना भेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 05:40 AM2023-06-10T05:40:59+5:302023-06-10T05:41:18+5:30
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते राज्यातील नेतृत्व बदलावरून अस्वस्थ आहेत.
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्र काँग्रेसचे नेते राज्यातील नेतृत्व बदलावरून अस्वस्थ आहेत. अलीकडेच राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर लगेच महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे समर्थक दिल्लीत दाखल झाले.
पटोलेंच्या समर्थकांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे व संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी भेट घेतली. नाना पटोले यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुका व्हाव्यात, असा आग्रह त्यांनी धरला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी नाना पटोले यांनी या समर्थकांची काँग्रेस श्रेष्ठींशी भेट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे सर्व समर्थक नागपूर व बुलढाणा जिल्ह्यांशी संबंधित आहेत.
अशोक चव्हाण सर्वात लोकप्रिय
यापूर्वी महाराष्ट्राचे निरीक्षक राहिलेले रमेश चेन्निथला यांच्या अहवालानुसार, अशोक चव्हाण राज्यातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. नाना पटोले यांचे समर्थक व अशोक चव्हाण यांच्या भेटीपूर्वी सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींकडे नाना पटोले यांना हटविण्याची विनंती केली होती.